सिंदेवाही : कोरोना संचारबंदीच्या काळात शहरासह तालुक्यात बाजारपेठ बंद असताना ही नागरिकांची रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना आपल्या आणि दुसऱ्याचा ही जीव धोक्यात घालून ही मंडळी भटकंती करताना दिसते.
शहरातील गल्ली बोळ माहीत असल्याने पोलिसांना चुकवून अनेक जण फिरताना दिसतात तर काहींना कारवाईचीही भीती वाटत नाही. तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असून बाजारपेठा बंद आहेत. अत्यावश्यक दुकाने वगळता संपूर्ण दुकाने बंद आहेत. असे असताना अनेक जण भटकंती करताना दिसून येत आहे. विविध रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी वर्दळ दिसते. दुचाकीस्वार शहरातून इकडे तिकडे फेरफटका मारताना दिसतात. पोलिसांनी नाकेबंदी करूनही गल्लीबोळातून रस्ता काढून ही मंडळी मुक्तपणे संचार करताना दिसून येते. विशेष म्हणजे, भटकंती करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सिंदेवाही नगरपंचायतीने वारंवार सूचना देऊनही भाजीपाला घेण्यासाठी दैनिक गुजरीमध्ये गर्दी करत असतात नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे, आपल्यासोबत दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये, असे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.