आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:41+5:302021-08-20T04:31:41+5:30
चंद्रपूर : बहीण-भावाचे अतूट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाने ...

आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ सजली
चंद्रपूर : बहीण-भावाचे अतूट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाने हिरमुसलेल्या व्यापाऱ्यांनी नव्या जोमाने राखी सणानिमित्ताने डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठ राख्यांनी फुलली आहे. यंदा नव-नव्या ट्रेंडमध्ये बाजारपेठेत राख्या उपलब्ध आहे.
बहीण-भावावरील प्रेम व्यक्त करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. बहीण-आणि भाऊ दोघेही या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. हिंदू संस्कृतीनुसार, श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. मागील वर्षी कोरोनामुळे हा सण अनेकांना साजरा करता आला नाही. मात्र आता निर्बंध हटले आहे. त्यामुळे बहीण आणि भाऊ दोघांना देखील या सणाची आतुरता लागून होती. मागील काही दिवसांत निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येसुद्धा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या उत्सुकतेने वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारपेठेत आणल्या आहेत. शहरातील गांधी चौक, गोल बाजार, जटपुरा गेट, बसस्थानक परिसरात राख्यांची दुकाने सजली आहेत. हॅण्डमेड, ब्रेसलेट राख्यांना ग्राहक पसंती देत आहेत. पाच रुपयांपासून २५० रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली.
बॉक्स
दहा टक्क्याने वाढ
मागील काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राख्यांच्या किमतीमध्येसुद्धा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यासोबतच कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने पाहिजे त्या प्रमाणात मालसुद्धा उपलब्ध झाला नसल्याने राखीच्या किमतीमध्ये १० टक्के वाढ झाली आहे.
बॉक्स
लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राख्या
छोटा भीम, डेरेमान, पोगो, निंजा हातोडी आदी कार्टून सिरियलने लहान मुलांना वेड लावले आहे. त्यामुळे स्कूल बॅगपासून कंपास आदी साहित्यावर याचे फोटो असले तर लहान मुलांकडून मागणी होते. त्यामुळे याच प्रकारच्या राख्यासुद्धा बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.
बॉक्स
बांबू राखीची मागणी
चंद्रपूर येथील मीनाक्षी वाळके यांनी तयार केलेल्या बांबू राख्यांची सर्वत्र मागणी दिसून येत आहे. ग्राहक त्यांचे घर गाठून बांबू राखीची मागणी करीत आहेत. संपूर्ण राज्यभरातून त्यांना राखीसाठी संपर्क केला जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बांबू राख्या तयार करून देत आहे.