चंद्रपूर बंदला अनेकांचा पाठिंबा
By Admin | Updated: July 3, 2014 23:29 IST2014-07-03T23:29:11+5:302014-07-03T23:29:11+5:30
वैद्यकीय महाविद्यालय व रिलायन्स जीओची टॉवर उभारणी या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चंद्रपूर बंदला अनेकांचा पाठिंबा
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रिलायन्स जीओची टॉवर उभारणी या मुद्यावरून पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रामदास रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विजय चंदावार, केशव जेनेकर, गोपाल सातपुते, प्रभाकर गट्टुवार, अशोक संगीडवार, श्रीराम तोडासे, रमेश वेगीनवार, अरुण दंतुलवार, नीलकंठ बलकी, प्रा.माणिक अंधारे, द्रौपदी काटकर, कुमुद राणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने ज्या तीन त्रृट्या दर्शविल्या, त्या वेळेत पूर्ण न केल्याबद्दल या बैठकीत सरकारची तीव्र शब्दात निंदा करण्यात आली. सरकारच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगत चंद्रपूर बंद सफल करण्याचे आवाहन करण्यात आले.
चंद्रपूर बंदला काँंग्रेसचे समर्थन
चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय याच सत्रात सुरू करण्याच्या मागणीला आणि मनपाने मंजुरी दिलेल्या रिलायन्स जीओ इन्ंफोकॉमचे टॉवर उभारण्याच्या आणि भूमिगत केबल टाकण्याचा ठराव रद्द करण्याच्या मागणीला समर्थन देत शहरातील काँग्रेसमधील गटही उद्याच्या बंदमध्ये सक्रियपणे उतरला आहे. धनशक्तीच्या बळावर रिलायन्स कंपनीचे ठेकदार मनपाला टॉवर उभारण्यासाठी बाध्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा आरोग्य संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदमध्ये काँग्रेस आणि संलग्न असलेल्या संगठनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असा उल्लेख असलेल्या पत्रकातून गजानन गावंडे यांनी केला आहे. शहरातील चार लाख नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने त्या विरोधात सकाळी १० वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत व त्यानंतर परत गांधी चौक असा मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या सोबतच सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानातून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. ती विश्रामगृहामार्गे गांधी चौक- जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. यात सहभागी होण्याची विनंती गजानन गावंडे गुरूजी यांनी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा
याच विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशननेही पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्या सावत्र वागणुकीची त्यांनीही निंदा केली. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, हा चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय आहे. २५ एकर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरक्षित करणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. आरोग्य विभाग आणि उच्च शिक्षण विभाग या दोन्ही विभागांच्या मतभीन्नतेमुळे चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय अडले आहे. त्यावर राज्य सरकार मार्ग काढत नसल्याने उद्याच्याचंद्रपूर बंदला आपल्या संघटनेचे नैतिक समर्थन आहे. मात्र वैद्यकीय सेवा ही अत्यावश्य कसेवा असल्याने रूग्णालये सुरू ठेव, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. अशोक भुक्ते, डॉ. महावीर सोईतकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे समर्थन
या बंदला चंद्रपूर चेंबर्स आॅफ कॉमर्सनेही पाठिंबा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री चव्हाण यांना एक निवेदन पाठवून आपल्या भावना कळविल्या आहेत. संघठनेचे अध्यक्ष सीए हर्षवर्धन सिंघवी यांच्याकडून प्रसिद्धीसाठी आलेल्या पत्रकातून, मनपाच्या परवानगीने शहरात येवू घातलेल्या १०० टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्याला भविष्यात गंभीर धोका होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालाच्या मार्गात राज्य सरकार अडथळा घालत असल्याची बाब दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या बाबीचा विरोध करण्यासाठी व्यापारी बांधव आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शुक्रवारी निषेध पाळणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)