अनेकांना कोरोनावरील दुसऱ्या डोसचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:29+5:30
केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही, केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो.

अनेकांना कोरोनावरील दुसऱ्या डोसचा पडला विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे लाखांहून जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अनेकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने दोनही डोसचे महत्त्व पटवून देणे व १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने, डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी येत होते. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला.
केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही, केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसने शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्तपेशीचा एक प्रकार आहे.
मुबलक लससाठा
- दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण, दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच. जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध असताना, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने वाढलेली नकारात्मकता, ही कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत. यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेतली. या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.