चंद्रपुरात चोरट्यांनी मांडलायं उच्छाद
By Admin | Updated: August 21, 2015 01:12 IST2015-08-21T01:12:07+5:302015-08-21T01:12:07+5:30
येथील बल्लारपूर मार्गावरील श्री पार्श्वनाथ पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री तीन बुरखाधारी लुटारूंनी धुमाकूळ घातल्याच्या घटनेनंतर

चंद्रपुरात चोरट्यांनी मांडलायं उच्छाद
नागरिकांमध्ये दहशत : साईबाबा वॉर्डात भरदिवसा घरफोडी
चंद्रपूर : येथील बल्लारपूर मार्गावरील श्री पार्श्वनाथ पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री तीन बुरखाधारी लुटारूंनी धुमाकूळ घातल्याच्या घटनेनंतर गुरूवारी भरदुपारी चोरट्यांनी येथील साईबाबा वॉर्डातील रहिवासी डॉ. मुरली नायडू यांचे घर फोडून आठ तोळे सोने व रोख २० हजार रुपयांची रक्कम पळविली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालिची असुरक्षितता निर्माण झाली आहे.
घटनेच्यावेळी साईबाबा वॉर्डातील रहिवासी डॉ.मुरली नायडू हे त्यांच्या क्लिनिकमध्ये होते, तर त्यांच्या पत्नी घराला कुलूप लावून एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या होत्या. नेमकी हिच संधी साधून चोरट्यांनी घर साफ केले. घरी परत आल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. काही वेळातच श्नापथकासह पोलीस पथक डॉ.नायडू यांच्या घरी पोहचले. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही.
शहरात चोरीच्या घटना वाढत असताना या घटनांकडे कानाडोळा करून पोलीस केवळ दारू तस्करांना हुडकून काढण्याच्या मागे लागले असल्याचे चित्र आहेत. दारूबंदी पोलिसांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली असल्याने पोलिसांनी सध्या दारू तस्करीला टार्गेट केले असल्याचा आरोप होत आहे. असे असतानाही रामनगर पोलिसांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरी व चोरीचे प्रयत्न होण्याच्या घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी साईबाबा वॉर्डाला लागून असलेल्या स्नेहनगर परिसरातील एका अपार्टमेन्टमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाही. चोरटेच सापडत नाहीत, तर तक्रार करायची कशाला, असा नागरिकांचा सवाल आहे. एकूणच रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)