मलेशियात पटकावली दोन सुवर्ण पदके
By Admin | Updated: May 18, 2017 01:16 IST2017-05-18T01:16:50+5:302017-05-18T01:16:50+5:30
येथील विनय बबन बोढे यांनी १४, १५ मे रोजी मलेशियाची राजधानी क्वालालांपूर येथील चेरास स्टेडियममध्ये

मलेशियात पटकावली दोन सुवर्ण पदके
‘मदर्स डे’ आईला समर्पित : घुग्घुसच्या विनय बोढे यांचे रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील विनय बबन बोढे यांनी १४, १५ मे रोजी मलेशियाची राजधानी क्वालालांपूर येथील चेरास स्टेडियममध्ये आयोजित १८ व्या माईलो इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकाविलीे. ते सुवर्ण पदकांसह मायदेशी परतल्यावर बुधवारी त्याचे चंद्रपूरला आगमन होताच रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आले. त्याने ही सुवर्ण पदके ‘मदर्स डे’च्या दिवशी आपल्या आईच्या चरणी समर्पित केली.
मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जगभरातील २० देशांमधील १ हजार ५०० कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील विनय बोढे यांनी काता प्रकारात उपांत्य फेरीमध्ये मलेशियाच्या एम. डी. रफिक याला ५-० गुणांनी पराभूत केले. विनय बोढे यांनी अंतिम फेरीमध्ये े इंडोनेशियातील च्यारेंन फैझानीला ४-१ गुणांनी मागे टाकत सुवर्ण पदक प्राप्त केले. कुमिते प्रकारात उपांत्य फेरीमध्ये मलेशियाच्या फैझुल इस्लाम याला चुरशीच्या सामन्यात ६-३ च्या फरकाने आणि अंतिम सामन्यात बांगलादेशाच्या दीन इस्लामी याला नॉकआउट करून तिरंगा फडकविला. याद्वारे त्यांनी भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक प्राप्त केले.
विनय यांनी ही पदके ‘मदर्स डे’च्या दिवशी जिंकली. त्याकरिता त्यांनी आपली पदके आईला समर्पित केली. त्यांचे चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी दुपारी आगमन होताच जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा घुग्घुस शहर अध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, ग्रा.प. सदस्य साजन गोहणे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे तसेच घुग्घुसमधील कराटेपटू व ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी घुग्घुसचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचे घुग्घुसमध्ये आगमन झाल्यावर घुग्घुस शहरवासीयांतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भारताला तीन सुवर्ण पदके
भारताला एकूण तीन सुवर्ण पदके प्राप्त झाली असून त्यात विनयनच्या दोन पदकांचा समावेश आहे. २०११ मध्ये जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विनय बोढे याने कांस्य पदक केले होते. त्याच्या मलेशियातील कामगिरीमुळे घुग्गुस, चंद्रपूर, वणी येथील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.