जिल्ह्यातील चार पालिकांवर महिलाराज
By Admin | Updated: July 6, 2014 23:49 IST2014-07-06T23:49:59+5:302014-07-06T23:49:59+5:30
जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा व मूल पालिकेतील नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे शनिवारी चारही नगराध्यक्षांना पदमुक्त करुन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चार पालिकांवर महिलाराज
नगराध्यक्ष पदमुक्त : आरक्षण जाहीर
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा व मूल पालिकेतील नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे शनिवारी चारही नगराध्यक्षांना पदमुक्त करुन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या नगरपालिकांमध्ये आरक्षण सोडतीनुसार नवीन नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. शनिवारी जिल्हाधिकाऱ्ययांकडून सूचना मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. शनिवारी दुपारनंतर नगराध्यक्षांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रभार दिला. या पदांसाठी आरक्षणही जाहीर झाले असून चार ठिकाणी महिला नगराध्यक्ष होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यापैकी तीन नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे तर मूल नगरपालिकेत भाजपाच्या नगराध्यक्ष विराजमान झाल्या होत्या. या चारही नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ २८ जून २०१४ रोजी संपल्यामुळे नवीन नगराध्यक्ष आरुढ होणार होते. परंतु राज्य शासनाने येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षपदांची मुदत संपलेल्या नगरपालिकेतील अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. दरम्यान, राज्यातील काही नगराध्यक्षांनी शासनाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच शासनाने निवडणुकीला दिलेली स्थगिती मागे घेतल्याने मुदत संपलेल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, राजुरा, बल्लारपूर व वरोरा या नगरपालिकांना येत्या काही दिवसांतच नवीन नगराध्यक्ष मिळणार आहे.
वरोरा नगरपालिकेत काँग्रेसचे विलास टिपले, बल्लापुरात काँग्रेसच्या रजनी मूलचंदानी, राजुऱ्यात काँग्रेसच्या आरती चिल्लावार तर मूलमध्ये भाजपाच्या उषा शेंडे नगराध्यक्षपदी कार्यरत होत्या. चार पालिकांपैकी तीन पालिकांचे नगराध्ययक्षपद काँग्रेसकडे तर एक पालिका भाजपाच्या ताब्यात होती.
दरम्यान, मंत्रालयात पार पडलेल्या पालिकांच्या नगराध्यक्षपद आरक्षण सोडतीनंतर मूलचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेकरिता राखीव झाले आहे. वरोरा पालिकेत सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव असून राजुऱ्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला नगराध्यक्षपदी आरुढ होणार आहे. बल्लारपूरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेकरिता राखीव झाले आहे.
येत्या आठ दिवसांत या चारही पालिकांच्या नगराध्यक्षपदांची निवडणूक होणार असून सर्व पालिकांवर महिलाराज येणार आहे. जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, मूल व वरोरा येथील नगराध्यक्ष पदांचा प्रभार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला असून चारही पालिकांच्या नगराध्यक्षपदांची निवडणूक येत्या १४ जुलै रोजीहोणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)