नागभीडची महाशिवरात्री आणि शिवरथ
By Admin | Updated: March 7, 2016 00:42 IST2016-03-07T00:42:18+5:302016-03-07T00:42:18+5:30
येथील महाशिवरात्रीची यात्रा आणि नागभीड येथील कामुनवार परिवार, असे आता एक समिकरणच तयार झाले आहे.

नागभीडची महाशिवरात्री आणि शिवरथ
घनश्याम नवघडे नागभीड
येथील महाशिवरात्रीची यात्रा आणि नागभीड येथील कामुनवार परिवार, असे आता एक समिकरणच तयार झाले आहे. कामुनवार परिवाराने काढलेल्या रथयात्रेशिवाय नागभीड येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा पुर्णच होऊ शकत नाही.
नागभीडच्या पश्चिमेला एक टेकडी असून या टेकडीवर शिवमंदीर आहे. या मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंभू असून या शिवलींगाच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर गर्दी करीत असतात. असे असले तरी महाशिवरात्री पर्वावर शिवटेकडीच्या पायथ्याशी यात्रेचे आयोजन परंपरेने होत आले आहे. शिवटेकडीच्या पायथ्याशी यात्रेचे आयोजन जसे परंपरेने होत आले आहे, तसेच कामुनवार परिवाराकडून शिवरथ मिरवणुकीचेही आयोजन गेल्या १५० वर्षापासून अविरत सुरू आहे.
शिवरात्रीच्या दिवशी रथावर विराजमान असलेले शिवजींची विधीवत पुजा अर्चा झाल्यानंतर कामुनवार यांच्या घरून या मिरवणुकीला सुरूवात होते. ढोल, ताशे आणि विविध वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक निघते. नंदीवर बसलेले शिवजी, बाजुला दोन पहारेकरी, एका रथावर विराजमान असतात. गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक फिरविण्यात येते. या मिरवणुकीत शहरातील सर्वच स्तरातील लोक सहभागी होत असतात.
गावातील प्रमुख मार्गाने ही शिवरथ यात्रा फिरविण्यात आल्यानंतर शिवजींचा हा रथ शिवटेकडीच्या पायथ्याशी ठेवण्यात येतो. नंतर दोन गुरुवारी भरणाऱ्या यात्रेत भाविकांकडून शिवलींगासोबतच या शिवरथाचीही पुजा होत असते. दुसऱ्या गुरूवारची यात्रा झाल्यानंतर कामुनवार कुटुंब महाप्रसादाचे वितरण करून व पुजा अर्चा करून परत हा रथ घरी आणत असतात. पुर्वी हा रथ लाकडी होता. आता तो लोखंडी करण्यात तर आलाच पण त्यात बरीच सुधारणाही करण्यात आली आहे. १५० वर्षाची परंपरा असलेला महाशिवरात्रीचा हा उपक्रम आता कामूनवार परिवारातील राहूल आणि रंजन हे दोघे भाऊ चालवित आहेत.