चंद्रपूर : राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा अधोरेखित केली आहेत. एकूण चित्र पाहता या निवडणुकांत महायुतीला आघाडी मिळालेली दिसून येते. अनेक ठिकाणी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष वरचढ ठरले असले, तरी काही भागांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनीही सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे.
या सगळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील निकाल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. येथे भाजपाला अनपेक्षित फटका बसला असून, अकरापैकी बहुसंख्य नगरपरिषदा भाजपाच्या हातातून निसटल्या आहेत. या निकालानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, या निकालात काँग्रेस पक्षाने स्पष्ट आघाडी घेत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांपैकी ७ नगरपरिषदांवर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
नगरपरिषदनिहाय निकाल
- भद्रावती नगरपरिषद : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी
- वरोरा नगरपरिषद : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी
- मूल नगरपरिषद : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी
- राजुरा नगरपरिषद : काँग्रेसचे अरुण धोटे विजयी
- गडचांदूर नगरपरिषद : अपक्ष (भाजप बंडखोर) निलेश ताजने आघाडीवर
- नागभीड नगरपरिषद : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी
- ब्रम्हपुरी नगरपरिषद : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी
- चिमूर नगरपरिषद : भाजपच्या गीता लिंगायत विजयी
- घुग्गुस नगरपरिषद : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के आघाडीवर
- बल्लारपूर नगरपरिषद : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर
- भिसी (नगरपंचायत) : भाजपचे अतुल पारवे विजयी
या निकालामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील बळ अधोरेखित झाले आहे. भाजप आणि शिंदे सेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही प्रभावी कामगिरी करत प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे.
या निकालांचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या नगराध्यक्षांसमोर विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रशासन सक्षम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा निकाल राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा मानला जात आहे.
Web Summary : Chandrapur Nagar Parishad election results favor Congress, winning seven of eleven seats. BJP faces unexpected losses, prompting internal criticism. Local political dynamics shift, impacting future elections.
Web Summary : चंद्रपुर नगर परिषद चुनाव में कांग्रेस ने 11 में से 7 सीटें जीतीं। बीजेपी को अप्रत्याशित नुकसान हुआ, जिससे आंतरिक आलोचना हुई। स्थानीय राजनीतिक समीकरण बदले, जिसका असर आगामी चुनावों पर पड़ेगा।