विविध मागण्यांसाठी मादगी समाज संघटनेचा मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 01:22 IST2014-07-01T01:22:45+5:302014-07-01T01:22:45+5:30
महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने

विविध मागण्यांसाठी मादगी समाज संघटनेचा मोर्चा
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती. यावेळी अनुसूचित जातीच्या ५९ जातीमध्ये अनु. क्र. ३५ वर मादगी या जातीची नोंद आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४१ नुसार १३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. परंतु सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता मादगी व त्यांच्या समकक्ष अतिमागासलेल्या जातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची वर्गवारी पाडून वेगळ्या आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळामध्ये २०१३ ला मादगी समाजातील जनतेनी कर्जाकरिता दिलेल्या कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, अनु.जाती मधील मादगी समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांवर सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची तरतूद करावी, अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ संचालक मंडळावर मादगी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना घेण्यात यावे, १ ते १० वीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणाऱ्या योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयात सभेमध्ये रुपांतर झाले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नारायण मुनघाटे, प्रदेश जिल्हा महासचिव राजेश पोलेवार, कोषाध्यक्ष रामाजी शंकावार, टी.एन. पोलेवार, मंदीप गोरडवार यांच्यासह अॅड. मोरे, ज्ञानेश्वर वाघमारे, विश्वनाथ कोरेवार, संजय बळकंटीवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)