अमोद गौरकार, लोकमत न्यूज नेटवर्क, शंकरपूर (जि. चंद्रपूर) : ताडोबाची शान ‘छोटा मटका’ची ‘नयनतारा’च्या प्रेमात पडलेला ‘ब्रह्मा’ (वय ३ वर्षे) नावाच्या वाघाशी झुंज झाली. यामध्ये ‘छोटा मटका’ने ‘ब्रह्मा’ला ठार केले. ‘छोटा मटका’ही जखमी झाला आहे. ही थरारक झुंज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील निमढेला बिटातील कक्ष क्रमांक ६३ मध्ये सोमवारी रात्री ८च्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी ती उघडकीस आली.
‘नयनतारा’शी मिलन करून ‘ब्रह्मा’ला मिळवायचे होते वर्चस्व
ताडोबाच्या बफर क्षेत्रात रामदेगी (ता. चिमूर) हे तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने ‘छोटा मटका’ व ‘नयनतारा’ या वाघांमुळेही ओळखला जात आहे. या जंगलावर ‘छोटा मटका’चे अधिराज्य आहे.
‘नयनतारा’सोबत मिलन करून आपला अधिवास निर्माण करण्यासाठी ताडोबामधून ‘ब्रह्मा’ नावाने ओळखला जाणारा वाघ काही दिवसांपासून याच परिसरात फिरत असल्याचे वनविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याची भनक ‘छोटा मटका’ला लागली होती. सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सुरू होण्याच्या वेळेत ‘छोटा मटका’ने ‘ब्रह्मा’वर हल्ला चढविला. या झुंजीत ‘ब्रह्मा’ जागीच ठार झाला.
मृत वाघाचे शवविच्छेदन
मंगळवारी सकाळी काही पर्यटकांना ‘छोटा मटका’ लंगडत चालत असून, त्याचे तोंड रक्ताने माखलेले दिसले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने सर्च ऑपरेशनमध्ये ‘ब्रह्मा’ नावाचा वाघ मृत्युमुखी पडलेला दिसला. मृत वाघाला शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटर येथे आणण्यात आले.
आधी ‘मोगली’, नंतर ‘बजरंग’, आता ‘ब्रह्मा’ला केले ठार
‘छोटा मटका’ने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचीही गय केलेली नाही. यापूर्वी त्याने ‘मोगली’ या वाघाला असेच ठार केले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘बजरंग’ वाघाला ठार करून त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. आता ‘ब्रह्मा’ला ठार करून आपणच अनभिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले.