लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पुणे येथून चंद्रपूर येथे येत असताना २०१४ मध्ये झालेल्या टॅव्हर्ल्स अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एकाला लोकन्यायालयात विमा कंपनीसोबत तडजोडीनंतर ५० लाख रुपयांचा विम्याचा दावा मंजुर करण्यात आला. विलंबाने का होईना, संबंधित अपघातग्रस्ताला दिलासा मिळाला आहे. त्यांना ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
चंद्रपूर येथील प्रमोद सुधाकर गौरकार हे पुणे येथून चंद्रपूर येथे १ जुलै २०२१४ रोजी चिंतामणी ट्रॅव्हल्सने येत होते. दरम्यान ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. यामध्ये गौरकार यांना दोन्ही पाय गमवावे लागले. या प्रकरणी मोटर वाहन अपघात प्राधिकरण चंद्रपूर येथे विमा कंपनुकडून नुकसान भरपाईसाठी ॲड. मनोज कवाडे, ॲड. वैशाली टोंगे यांच्या मार्फत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. मागील काही वर्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध दावा चालल्यानंतर १४ डिसेंबर २०२४ ला आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये या प्रकरणी तडजोड करण्यात आली. तडजोडीनंतर विमा कंपनीने संबंधित अपघातग्रस्त प्रमोद गौरकार यांना ५० लाख रुपयांचा विमा देणे मान्य केल्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले आहे.
या प्रकरणात अर्जदार प्रमोद गौरकार यांच्या वतीने ॲड. मनोज कवाडे, ॲड. वैशाली टोंगे यांनी तर नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे ॲड. मंगेश देशपांडे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण काकडे यांनी काम बघितले. इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रमोद गौरकार यांना ५० लाख रुपयांचा धनादेश जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म, पॅनल न्यायाधीश आय. ए. नाजीर, विधी सेवा प्राधिकरनाचे सचिव सुमित जोशी व पॅनल अधिवक्ता ॲड. रवींद्र हस्तक यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.