स्थानिक सुट्ट्यांना शिक्षण विभागाची कात्री
By Admin | Updated: August 3, 2014 23:17 IST2014-08-03T23:17:28+5:302014-08-03T23:17:28+5:30
जिल्हा परिषद शाळांच्या स्थानिक सुट्ट्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग मंजुरी देते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत.

स्थानिक सुट्ट्यांना शिक्षण विभागाची कात्री
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
जिल्हा परिषद शाळांच्या स्थानिक सुट्ट्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग मंजुरी देते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोळा, तान्हा पोळा, हरितालिका तसेच अन्य सणांच्या दिवशीही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातही सणांच्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची मानसिकता नसते. परिणामी शाळा सुरु असूनही विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवितात. त्यामुळे वर्गात गुरुजी आणि घरी विद्यार्थी असा प्रकार अनेकदा घडतो.
मागील वर्षीच्या तुलनेत स्थानिक सुट्या यावर्षी प्रशासनाने कमी केल्या आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यात या सुट्यांना मंजुरी दिली आहे. परंतु चंद्रपूर प्रशासनाला या सणांच्या सुट्यांची अॅलर्जी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहे. पोळा हा सण ग्रामीण भागात महत्त्वाचा आहे. ग्रामीण नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पोळ्याच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र शिक्षण विभागाने याच दिवशी शाळा सुरु ठेवण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंदावर विरजण पडणार आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान बालके नंदीबैलाची पूजा करतात. त्यानंतर गावातून फेरी काढतात. मात्र या दिवशीसुद्धा शाळा सुरु राहणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
रक्षाबंधनाचीसुद्धा यावर्षी प्रशासनाने सुटी रद्द केली आहे. मात्र या दिवशी रविवार आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
भारतातील कृषी व्यवसाय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये शेती व्यवसायाकडे दुय्यम नजरेने बघितले जाते. शेती व्यवसायाकडे युवकांनी वळावे यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र पोळ्यासारख्या सणाची सुटी रद्द केल्याने विद्यार्थ्यांना शेती आणि बैलांचे महत्त्व कसे कळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने विविध पाऊले उचलले असले तरी, विद्यार्थ्यांना संस्कृती माहित होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
स्थानिक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षी मुख्याध्यापकाच्या अधिकारातील दोन सुट््या दिल्या जात होत्या. त्याही सुट्या यावर्षीपासून रद्द करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात संस्कृतीनुसार काही कार्यक्रम, सण-वार साजरे केले जाते. त्या दिवशी विद्यार्थी शाळेला बुट्टी मारतात. अशावेळी मुख्याध्यापकाच्या अधिकारातील सुटी महत्त्वाची असते. मात्र ती सुटीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. यामुळे एखाद्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत उपस्थित नसले तरीही शिक्षकांना मात्र पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.