पशुपालकांनी घेतले दुग्धव्यवसायाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:02 IST2018-04-07T23:02:16+5:302018-04-07T23:02:16+5:30

भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील दूध उत्पादक पशुपालकांचा वर्धा जिल्ह्यातील नागापूर येथे अभ्यास दौरा पार पडला. यावेळी कचराळा येथील पशुपालकांना दुग्धोत्पादनाचे धडे देण्यात आले.

Livestock Lessons | पशुपालकांनी घेतले दुग्धव्यवसायाचे धडे

पशुपालकांनी घेतले दुग्धव्यवसायाचे धडे

ठळक मुद्देकचराळा येथील पशुपालकांचा सहभाग : अभ्यास दौऱ्यातून मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील दूध उत्पादक पशुपालकांचा वर्धा जिल्ह्यातील नागापूर येथे अभ्यास दौरा पार पडला. यावेळी कचराळा येथील पशुपालकांना दुग्धोत्पादनाचे धडे देण्यात आले.
पंचायत समिती भद्रावतीचा पशुवैद्यकीय दवाखाना घोडपेठ अंतर्गत कचराळा या गावात कामधेनू योजना राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने या अभ्यासदौºयांचे आयोजन केले. यावेळी घोडपेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. युसुफ शेख, कामधेनू योजनेचे अध्यक्ष तुळशीदास ठुनेकर तसेच कचराळा येथील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
नागापूर या गावात मागील ७० पेक्षा जास्त वर्षांपासून अविरतपणे नागापूर गौ दुग्ध उत्पादक संस्थेद्वारे दूध संकलन केले जाते. सध्या या संस्थेतर्फे दररोज तीन हजार ५०० लिटर दूध संकलित करून वर्धा येथील गोरस भांडारात पोहोचविले जाते.
संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल कारेमोरे म्हणाले, या गावात प्रत्येकांच्या घरी जर्सी, होलस्ट्रीन फिजीयन जातीची जनावरे आहेत. या जनावरांपासून दररोज पंधरा ते वीस लिटर दूध मिळते. या गावातील लोकांकडे शेतजमिनी फार कमी असल्याने त्यांनी दुग्ध उत्पादनावर भर दिला आहे. दुध वाढीकरिता जनावरांना हिरवे वैरण, मिनरल मिक्स्चर तसेच उच्च दर्जाचे पशुखाद्य पुरविले जाते.
गोचीड निर्मूलन, जंत नाशकीकरण, मलमूत्राचे योग्य व्यवस्थापन, चाºयाच्या गव्हाणी, स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जनावरांना दिवसातून दोन वेळा आंघोळ घातली जाते. तसेच गोठ्यातील स्वच्छतेवर भर दिला जातो. जनावरांची योग्य निगा राखल्यामुळे दुग्धोत्पादन भरपूर प्रमाणात होत आहे. त्यामुळेच आर्थिक सुबत्ता नांदत आहेत. अशा प्रतिक्रिया पशुपालकांनी यावेळी दिली.
नागापूर येथील पशुपालकांप्रमाणेच भद्रावती तालुक्यातील पशुपालकांनीही पशुपालन करून व्यवसाय केल्यास गरिबी, दारिद्रय, बेकारी, आत्महत्या यांच्यावर मात करून चांगले जीवन जगता येईल. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन करावे, असे आवाहन घोडपेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले.

Web Title: Livestock Lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.