रसायनयुक्त पाण्याने जीवनदायिनी काळवंडली

By Admin | Updated: November 14, 2015 01:11 IST2015-11-14T01:11:10+5:302015-11-14T01:11:10+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीत मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने ही नदी काळवंडली आहे.

Life-colored blackboard with chemical water | रसायनयुक्त पाण्याने जीवनदायिनी काळवंडली

रसायनयुक्त पाण्याने जीवनदायिनी काळवंडली

शेती धोक्यात : हजारो मासे मृत्युच्या छायेत
नितीन मुसळे सास्ती
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीत मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने ही नदी काळवंडली आहे. सोबतच या नदीतील हजारो माशांवरही मृत्युचे संकट घोंगावत आहे.
याच नदीतील पाणी शेतकरी सिंचनासाठी वापरतात. त्यामुळे शेतातील पिकांनाही बाधा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पाण्यावर विविध उद्योग व पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे वर्धा नदी जीवनदायिनी ठरली आहे. मात्र जिल्ह्यातील काही कारखानदारांच्या बेबंदशाहीमुळे या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक कारखानदार उद्योगातील रसानयुक्त पाणी कारखान्यातील विषारी गाळ, कचरा या नदीत सोडत आहेत.
राजुरा तालुक्यातील कुर्ली, मारडा, धिडशी, कढोली, कोलगाव, सास्ती, चुनाळा, सातरी, चनाखा, विहीरगाव, नलफडी, सिंधी, धानोरा अशा विविध गावांतून वर्धा नदी वाहते. त्यामुळे या गावांना विविध कारणांनी या नदीचा फायदा होतो. परिसरातील जनावरेदेखील याच नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवितात. मात्र मागील दोन दिवसांपासून बल्लारपूर पेपर मिलद्वारा या नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे.परिणामी नदीतील पाणी काळवंडले असून ते पाणी पिण्यायोग्य नाही.
तंबी देऊनही मुजोरी
१९ मे २०१३ रोजीसुद्धा बल्लारपूर पेपर मिलचे पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. संबंधित कारखानदाराला धारेवर धरून तंबी दिली. परंतु या सर्व बाबींना न जुमानता कारखान्यातील रसायनयुक्त पाणी अजुनही नदीत सोडलेच जात आहे.

वर्धा नदीच्या भरवशावर राजुरा तालुक्यातील शेकडो मच्छीमार बांधवांची उपजिविका चालते. परंतु ऐन दिवाळीच्या पर्वात कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कारखानदाराविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
-विजय कार्लेकर, अध्यक्ष मच्छींद्र मत्स्यपालनसहकारी संस्था राजुरा
कारखान्यातील ईटी प्लँट २४ तास सुरू राहत असल्यामुळे आमच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी नदीत जाणे शक्यच नाही. मी सध्या सुटीवर आहे. आल्यानंतर यासंदर्भात चौकशी केली जाईल.
सी.एस.काशिकर, महाव्यवस्थापक (पर्यावरण) बल्लारपूर पेपर मिल

Web Title: Life-colored blackboard with chemical water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.