डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:43+5:302021-09-11T04:27:43+5:30
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेली शिक्षक भरती आणि डीएड पदवीकाधारकांची वाढलेली संख्या यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ ...

डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेली शिक्षक भरती आणि डीएड पदवीकाधारकांची वाढलेली संख्या यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. पूर्वी ज्या अभ्यासक्रमासाठी रांगाच्या रांगा लागायच्या आता त्याच अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा केवळ १४७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यापैकी पडताडणीमध्ये ९३ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील अनेक जागा रिक्त राहणार आहेत.
पूर्वी हमखास नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीएडकडे बघितले जायचे. डीएडला प्रवेश मिळवण्यासाठी चडाओढ असायची. तर बहुतेकजण प्रवेश मिळवण्यासाठी वारेमाप पैसे मोजायचे. त्यामुळे अनेक खाजगी कॉलेज वाढले. मागील काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय, एक शासन अनुदानित महाविद्यालय, दोन अल्पसंख्याक महाविद्यालय व २५ शासन मान्यताप्राप्त महाविद्यालये अशी एकूण २९ डीएड महाविद्यालये होती. त्यांची प्रवेश क्षमता एक हजार ७७५ होती. मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार डीएड पदवीधारकांची फौज तयार झाली. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. यंदा जिल्ह्यात केवळ १४७ जणांनी अर्ज केले असून त्यापैकी केवळ ९३ अर्जच वैध ठरले आहेत.
बॉक्स
केवळ दोनच महाविद्यालये सुरू
मागील काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय, एक शासन अनुदानित महाविद्यालय, दोन अल्पसंख्याक महाविद्यालय व २५ शासन मान्यताप्राप्त महाविद्यालये अशी एकूण २९ डीएड महाविद्यालये होती. त्यांची प्रवेश क्षमता एक हजार ७७५ होती. मात्र मागील काही वर्षांत डीएडला विद्यार्थीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील २९ महाविद्यालयांपैकी २७ महाविद्यालये बंद झाली. केवळ चंद्रपूर येथील जनता अध्यापक अनुदानित विद्यालय, व वि. तु. नागापुरे अध्यापक विद्यालय गोंडपिपरी ही दोन महाविद्यालये सुरू आहेत.
बॉक्स
नोकरीची हमी नाही
मागील काही वर्षांपूर्वी डीएड अर्जाच्या माहिती पुस्तकावरच ‘नोकरीची हमी नाही’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यातच मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. तर खासगी महाविद्यालयांमध्ये लाखो रुपये डोनेशन मागण्यात येते. त्यामुळे इतर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी वळत असून डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवीत आहेत.
बॉक्स
टीईटी उत्तीर्णांची मुदत संपली
शिक्षक पात्रता परीक्षेची मुदत सात वर्षे ठेवण्यात आली होती. पहिली टीईटी परीक्षा सन २०१५ मध्ये झाली होती. त्याची मुदत २०२१ पर्यंत होती. मात्र आता ती टीईटी पात्र ठरणार नाही. मध्यंतरी ती टीईटी चालणार असल्याचे शिक्षक विभागाने स्पष्ट केले होते. परंतु, अद्यापही तसले कुठलेही निर्देश आले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे टीईटी मुदत संपली की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
-----
कोट
डीएड अभ्यासक्रमासाठी १४७ अर्ज आले असून त्यापैकी ९३ अर्ज वैध ठरले आहेत. जनता अध्यापक विद्यालय चंद्रपूर व वि. तु. नागपुरे अध्यापक विद्यालय गोंडपिपरी या दोन महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रकिया सुरू आहे. पूर्वीच्या तुलनेत डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला दिसून येत आहे.
पाटील, प्राचार्य डाएट कॉलेज चंद्रपूर