आंगणवाडी बालकांना चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:43+5:302021-08-20T04:31:43+5:30
मूल : मुले ही उद्याचा भविष्यकाळ आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व ठप्प पडले. बालकांवर आंगणवाडीतून होणारे शैक्षणिक संस्कारही बंद आहे. ...

आंगणवाडी बालकांना चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे
मूल : मुले ही उद्याचा भविष्यकाळ आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सर्व ठप्प पडले. बालकांवर आंगणवाडीतून होणारे शैक्षणिक संस्कारही बंद आहे. हे हेरुन येथील बालप्रकल्प अधिकारी व आंगणवाडी सेविकांनी चित्रफितीद्वारे चिमुकल्यांना शिक्षण देण्याची संकल्पना अंमलात आणली. महिनाभरापासून मूल तालुक्यात चित्रफितीच्या माध्यमातून चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरू आहे. यामुळे बालकांसह पालकांचा उत्साह वाढला आहे.
बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत मूल तालुक्यात ३ ते ६ वयोगटांतील ३ हजार ६४८ बालके आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. ही बाब हेरून इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे ३ ते ६ वयोगटांतील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची संकल्पना बालप्रकल्प अधिकारी आरती जगताप यांना सुचली. त्यांनी मूल तालुक्यातील आंगणवाडीसेविका वर्षा पाल (रा. चांदापूर), ज्योती शेंडे (रा. गडीसुर्ला) यांच्यासह होतकरू युवक सुरज रायपूरे रा. मोरवाही याची मदत घेतली. ग्रामीण भागात बऱ्याच लोकांकडे मोबाइल असल्याने त्या पालकांचा एक समूह तयार करण्यात आला. बालकांना आपल्या बोली भाषेतील प्रत्यक्ष अध्यापन करतानाची चित्रफित तयार करण्यात आली. या चित्रफित पालकांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकणे सुरू केले. पालक या चित्रफित आपल्या पाल्यांना दाखवित आहे. या माध्यमातून चिमुकली मुलेही मोठ्या आवडीने त्या चित्रफिती पाहत आहे. काय आश्चर्य आपल्याच आंगणवाडी शिक्षिका शिकवित असल्याचे पाहून चिमुकलेही त्याकडे आकर्षिले जात आहे. त्यांना हा अभ्यास सहज समजत आहे. ज्या पालकांकडे मोबाइल नाही त्यांच्या पाल्यांना स्वत: आंगणवाडी सेविका आपल्या मोबाइलच्या माध्यमातून चित्रफित दाखवून समजावून सांगत आहे. केवळ मूल तालुक्यात या चित्रफितीद्वारे १६१ आंगणवाडी केंद्राच्या ३ हजार ६४८ बालकांना शिक्षण दिले जात आहे.