चंद्रपूर : काकासोबत घराकडे येत असलेल्या आठ वर्षाच्या प्रशिकचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी (१८ सप्टेंबर) रात्री सात वाजता ही घटना घडली. आठ वर्षांच्या मुलावर झडप घालत बिबट्याने त्याला उचलून नेले. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावर मुलाचा मृतदेह आढळला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रशिक बबन मानकर असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मानकर यांच्या घरामागे एक टेकडी असून, तिथे भरपूर झाडं आहेत. तिथेच हा बिबट्या दबा धरून बसला होता.
काकासोबत घरी येत असतानाच बिबट्याने घातली झडप
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक काकासोबत गावातील मस्कन्या गणपतीच्या जेवणासाठी गेला होता. तिथून तो काकासोबत घरी येत होता. घर काही अंतरावर असतानाच झुडपातून बिबट्याने प्रशिकवर झडप मारली. त्याला तोंडात पकडून तो झाडांमध्ये गुडूप झाला.
अवघ्या काही क्षणातच बिबट्या आला आणि प्रशिकला घेऊन गेला. त्याच्या काकाला काहीच करता आले नाही. त्यांनी तातडीने याची माहिती घरी आणि गावात दिली. त्यानंतर सिंदेवाही पोलीस गावात आले. प्रशिकचा शोध सुरू करण्यात आला. टेकडी परिसरात प्रशिकचे काही कपडे आणि रक्ताचे डाग आढळून आले.
ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट
घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत हल्लेखोर बिबट्याचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह नेऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
गावात व परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले असून, परिस्थिती हाताळण्यासाठी डीसीएफ, एसीएफ, तहसीलदार सिंदेवाही, पोलिस कर्मचारी तसेच दंगा पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, गुरुवारी रात्री सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान बिबट्याने एका वनकर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.