यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:00 IST2019-02-08T21:59:00+5:302019-02-08T22:00:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांनी जहर खाऊन फासावर लटकून जीवन संपवू नये. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी धाडसाने व्यवसाय करावा. ...

यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी जहर खाऊन फासावर लटकून जीवन संपवू नये. शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी धाडसाने व्यवसाय करावा. कर्जाला घाबरू नये. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी लहान व्यवसाय, शेती उद्योग उभे करावे. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले.
जगदगुरु संत तुकाराम महाराज जयंती पर्वावर धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरच्या वतीने सभागृहात प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा नुकताच ‘शेतकऱ्याच्या पोरा लढायला शिक’ काव्य गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी समाज वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ११ वर्षांपासून नित्यनेमाने सुरू असलेली प्रार्थना सादर करून संत तुकाराम महाराजांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते होते, तर उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर तर स्वागताध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले होते. विचारपीठावर मंडळाचे साहित्य व सांस्कृतिक कक्ष प्रमुख प्रभाकर पारखी, सचिव अतुल देऊळकर, सल्लागार विनायकराव धोटे, उपाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे तसेच इतर कार्यकारिणी सदस्य व महिला संघटन प्रमुख सविता कोट्टी उपस्थित होते.
प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या काव्यगायनाने उपस्थित श्रोते भारावून गेले. याप्रसंगी मनोहर पाऊणकर म्हणाले की, नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने अनेक नवीन उपक्रम आखले आहेत. समाजाने आधुनिकतेची नवीन विचाराची कास धरावी. आपसी हेवेदावे विसरावे. महिलांनी बुरसटलेल्या रूढीपरंपरेच्या बाहेर येऊन संक्रांतीला पुस्तकाचे वाण द्यावे. म्हणजे वाचनाची आवड रुजली जाईल. अध्यक्ष अॅड. सातपुते म्हणाले, पुरुषाबरोबर महिलांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असले पाहिजे तरच समाजाची प्रगती होऊ शकते. प्रत्येकाने मला समाजाचे काही देणे लागते ही भावना जोपासावी. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रभाकर पारखी यांनी केले. स्वागताध्यक्ष सुधाकर अडबाले यांनी स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य बापूराव टोंगे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुप्रसिद्ध कवी मनोज बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. रवी वरारकर यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाज मंडळ कार्यकारिणी, साहित्य व सांस्कृतिक कक्षाच्या सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.