मजूर मिळेना, विद्यार्थीही निघाले कापसाला

By Admin | Updated: October 31, 2015 02:05 IST2015-10-31T02:05:22+5:302015-10-31T02:05:22+5:30

जिल्ह्यातील राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Laborers, and even the students also got squeezed | मजूर मिळेना, विद्यार्थीही निघाले कापसाला

मजूर मिळेना, विद्यार्थीही निघाले कापसाला

विरूर(स्टे) : जिल्ह्यातील राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राजुरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत सध्या पांढऱ्या सोन्याने फुलले आहे. मात्र पांढऱ्या सोन्याला वेचण्यासाठी मजुरांचा अभाव असून वेचणीचे भाव सात ते आठ रुपये प्रतिकिलो असल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढली आहे.
शेतातील कापूस टवटवीत दिसत असतानाही शेतकऱ्यांचा चेहरा मात्र कोमेजलेला आहे. अशातच शालेय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची बाजू सावरली आहे. शाळांना बुट्टी मारून ग्रामीण भागातील विद्यार्थी सध्या कापूस वेचणीला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
कापूस वेचणीला सहा ते सात रुपये प्रति किलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे परिसरातील चिंचोली, अन्नुर अंतरगाव, कविटपेठ, सुब्बई, डोंगरगाव, चिंचाळा, केळझर, भेंडाळा, सिर्सी, टेंभुरवाही, चिचबोडी, खांबाडा, सिंधी, नलफडी, मूर्ती, चनाखा, सातरी, विहीरगाव, विरूर परिसरात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस नसला तरी कापसाचे पिक शेतात उभे आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस फुटून आहे. परिसरातील गावातील कापूस वेचणाऱ्या मजुरांची सध्या चांदी असून गरीब होतकरू शाळकरी विद्यार्थीसुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे.
निंदण करणे, टोबणी, पेरणी यासाठी दिवसांनुसार मजुरी मिळत असल्याने मजुर ११ ते ५ या वेळेत शेतात राबतात. मात्र कापूस वेचणीचे नियम वेगळे आहेत. जो जितका जास्त कापूस वेचणार, त्याला तितके अधिक पैसे मिळतील. त्यामुळे सकाळ पाळीतील महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा पहाटेच कापसाला जात आहेत. कापसाच्या वेचणीतून रोज ३५० ते ४०० रुपये रोजी विद्यार्थी व शेतमजूर मिळवित असल्याचे चित्र आहे. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी एक रुपयांप्रमाणे कापूस वेचणी होती. कापसाला तीन ते तीन हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव असायचा. कापूस खरेदीचा भाव मात्र त्या प्रमाणात वाढला नाही. यावर्षी चार हजार ते चार हजार २०० रुपयापर्यंत भाव आहे. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी सात ते आठ रुपये प्रतिकिलो कापूस वेचणीचा भाव आहे. शासनाने प्रति क्विंटलमागे दिलेली भाववाढ मजुरांच्या खिशात जात आहे. मजुरालाही रोख मजुरी द्यावी लागत आहे. जो मालक नगदी मजुरी देतो, अशाच मालकाच्या शेतात मजुरही जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
परिसरातील बहुतांशी शेतकरी कापूस वेचला. मात्र पुढे कापसाला भाव येईल, या आशेने तो साठवून करून ठेवला आहे. मात्र ज्या मजुरांनी कापूस वेचला त्यांची रक्कम देण्यासाठी कापूस कवडीमोल भावात विकल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.
विशेष म्हणजे, बाहेर गावातून मजुर आणण्यासाठी आणि पुन्हा त्यांना सोडण्यासाठी आॅटो, मिनीडोर किंवा करावा लागतो, ही विवंचनादेखील शेतकऱ्यांपुढे आहे. निसर्ग आणि सरकारने साथ दिली तर ठीक, नाही तर त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे दिवसरात्रं हाडाची काडं करून शेतात राबणाऱ्या कष्टकरी बापाला मुलाबाळाची चिंता सतावते आहे. यावर्षी शेतीचा हंगाम करण्यासाठी सावकाराकडून उसनवारीने कर्ज काढले. मात्र उत्पन्न कमी आणि त्याला मिळणारे दर कमी झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. (वार्ताहर)

Web Title: Laborers, and even the students also got squeezed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.