शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा
By Admin | Updated: July 27, 2014 23:39 IST2014-07-27T23:39:09+5:302014-07-27T23:39:09+5:30
या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट

शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा
शेतकरी हतबल : दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत
चंद्रपूर : या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
आधी पावसाने डोळे वटारले नंतर संततधार पावसाने झोडपले; आणि आता मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. मजुरीचा वाढता दर बघून तर, त्याचे जगणे आणखी कठीण होत आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल महिन्याभरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे नष्ट झाले. अशा परिस्थितीत अनेकांनी दुबार पेरणी करून आलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर संततधार पावसाने हजेरी लावून पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यामुळे शेतात पाणी साचले आणि नानाविध समस्या निर्माण झाल्या.
अशातच पेरणी केलेले बियाणे पऱ्ह्यांच्या स्वरूपात रोवणीयोग्य झाल्यानंतर आता काहींनी रोवणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र मजुरांचा तुटवडा आणि मजुरीच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मूल, सावली, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा आदी तालुक्यांमध्ये भातासाठी तर कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती आदी तालुक्यांमध्ये कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या दोन्ही कामांसाठी मजुरांची मोठी मागणी असते. मात्र मजूरी वाढूनही शेतकऱ्यांना मजुर मिळणे कठिण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)