चंद्रपुरात पहिल्यांदाच कोव्हॅक्सिन लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST2021-03-14T04:26:15+5:302021-03-14T04:26:15+5:30
कोरोना संसर्ग वाढत असतानाच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस देण्याची ...

चंद्रपुरात पहिल्यांदाच कोव्हॅक्सिन लस
कोरोना संसर्ग वाढत असतानाच जिल्ह्यात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींनाही लस देण्याची परवानगी मिळाल्याने सर्वच केंद्रांवरून प्रतिसाद मिळत आहे. लस घेताना कुणालाही ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतही कक्ष सुरू करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही केंद्रनिहाय उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे लसींची मागणी नोंदविली होती. शुक्रवारी मुंबईतून लसींचे डोस नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयात प्राप्त झाले होते.
कोव्हॅक्सिनसाठी स्वतंत्र केंद्र?
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ४० हजार डोस पाठविण्यात आले. ही लस सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली. ही लस टोचल्यानंतर आजपर्यंत कुणाच्याही प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाला नाही, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. शनिवारी प्रथमच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला मिळाले. मात्र, ही लस टोचण्यासाठी नवीन स्वतंत्र केंद्र सुरू करणार की जुन्या केंद्राचा पर्याय स्वीकारणार याबाबत स्पष्टता नाही.
कोट
कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले आहेत. लस पूर्णत: सुरक्षित आहे. ही लस शक्यतो स्वतंत्र केंद्रात दिली जाऊ शकते. पण, यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही.
- संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, जि.प. चंद्रपूर