लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : अनैतिक संबंधातून रामेश्वर निषाद याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मृतकाची पत्नी, तिचा प्रियकर व अन्य एक या तिघांनी मिळून कट करीत हे हत्याकांड घडवून आणले. यातील तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्या दिवशी बल्लारपूर येथील डाॅ. आंबेडकर वार्डातील रहिवासी रामेश्वरची हत्या झाली, त्यादिवशी त्याच्या पत्नीला आरोपी सुरज सोनकर याने फोन करून सांगितले होते की, तुझ्या नवऱ्याला मारण्यासाठी नेत आहे, हेदेखील पोलीस तपासात पुढे आले आहे.
दोन महिन्यांपासून शिजत होता कट रामेश्वरला मारण्याचा कट दोन महिन्यापासून सुरू होता. सुरजने यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी येथील अभिजित पांडे यास रामेश्वरला मारण्यासाठी १५ हजारांची सुपारी दिली होती. मृतक रामेश्वरच्या घरच्या लोकांना रामेश्वरच्या पत्नीचे प्रेम प्रकरण माहीत झाले, तेव्हा त्यांनी छट पूजेच्या दिवशी तिच्याकडून यानंतर सुरजशी संबंध ठेवायचे नाही म्हणून बजावले होते. तरीही त्यांचे संबंध सुरूच होते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे १० मार्चला सुरजने रामेश्वरला दारू पाजून राजुरा येथील रामूच्या धाब्यावर नेऊन त्यानंतर हत्याकांड घडवून आणले.