खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:19+5:302021-07-02T04:20:19+5:30
कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली ...

खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी
कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
वाहनावर मोबाईल वापरू नये
सिंदेवाही : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करताना दिसून येत आहेत. हा प्रकार त्यांच्या व इतरांसाठीही धोकादायक आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्राॅसिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबूराव शेडमाके चौक येथे गतिरोधक नाही. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसते. यामुळे अपघाताची शक्यता असते.
वर्दळीच्या मार्गावर दिशादर्शक फलक हवे
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गांपैकी एक आहे. त्यामुळे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाहीत. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोरपना येथे हवे पशुधन विकास अधिकारी
कोरपना : येथील पंचायत समितीत पशुधन विकास अधिकारी विस्तार पदाला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या पदाला त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सद्यस्थितीत या मंजुरी नसलेल्या पदाचा अतिरिक्त कारभार पशुधन विकास अधिकारी वर्ग एक यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे त्यांना दुहेरी कामकाजाची धुरा सांभाळावी लागत आहे. आधीच कोरपना तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच या पदाला मंजुरी नसल्याने संपूर्ण पशुसंवर्धन विभाग रामभरोसे आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने या पदाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन त्वरित पदास मंजुरी मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत हे पद अस्तित्वात नसल्याने पशुसंवर्धन विभाग संबंधित कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.