शिधापत्रिकांवरील केरोसिन बंदचे कटकारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:35 IST2018-12-17T22:34:43+5:302018-12-17T22:35:13+5:30
राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस सिलिंडर कनेक्शनधारक शिधात्रिका धारकांसह ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकांचे केरोसीन बंद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. या कुटुंबांनी स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न उपस्थित करून हे राज्य सरकारचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान सभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

शिधापत्रिकांवरील केरोसिन बंदचे कटकारस्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला गॅस सिलिंडर कनेक्शनधारक शिधात्रिका धारकांसह ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, अशा शिधापत्रिकांचे केरोसीन बंद केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २९४ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही. या कुटुंबांनी स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न उपस्थित करून हे राज्य सरकारचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान सभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या आदेशान्वये शिधापत्रिकाधारकांकडून गॅस कनेक्शन नसल्याचे ‘हमीपत्र’ भरून घ्यावे. ज्यांनी ते लिहून दिले त्याच कुटुंबांना केरोसिन देण्यात येणार आहे. वास्तविक, ही माहिती असंख्य गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांकडे पोहचलीच नाही. वास्तविक, कुणाकडे गॅस कनेक्शन आहे ना नाही याची माहिती पुरवठा विभागाकडे आहे. मग हमीपत्राची गरज काय, असा सवालही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबाकडे कुठलेही गॅसचे कनेक्शन नाही, अशा कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे केरोसीन मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही गॅस कनेक्शन नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन देण्यात यावे, अशी मागणीही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४ लाख ९९ हजार ८४७ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. पैकी एक वा दोन गॅस कनेक्शनधारक कुटुंबांची संख्या ३ लाख ६७ हजार ५५३ इतकी आहे. १ लाख ३२ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांकडे गॅस कनेक्शनच नाही. या कुटुंबाना केरोसिन मिळणे क्रमप्राप्त आहे, मात्र त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, याकडेही आ. वडेट्टीवाप यांनी लक्ष वेधले.
यावेळी माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनोद दत्रात्रेय, विनायक बांगडे, आसावरी देवतळे व अन्य पदाधिकारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे यांच्यासह चंद्रपूर -गडचिरोली जिल्हा केरोसिन डिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
८ व ९ जानेवारीला काँग्रेसची संघर्ष यात्रा जिल्ह्यात
८ व ९ जानेवारी २०१९ रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राज्यभरात निघालेली संघर्ष यात्रा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. राज्यातील सर्व वरिष्ठ नेते या यात्रेत सहभागी असणार आहे. दरम्यान, जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने सर्व जि.प. सदस्य व काँगे्रसच्या सर्व तालुकाअध्यक्षांची बैठक पार पडली. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गाव व घरापर्यंत हे अभियान पोहचणार असून राज्य व केंद्र सरकारने राबविलेल्या चुकीच्या योजनांची माहिती देणार आहे, असेही आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.