काळे गुरूजींच्या निधनाने चिमूर जिल्हा चळवळ पोरकी
By Admin | Updated: May 24, 2017 02:06 IST2017-05-24T02:06:29+5:302017-05-24T02:06:29+5:30
चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी

काळे गुरूजींच्या निधनाने चिमूर जिल्हा चळवळ पोरकी
उमा नदी घाटावर अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उमा नदीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा अॅड. महेशदत्त काळे यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या निधनामुळे चिमूर क्रांतीचा एक साक्षीदार हरपला असून चिमूर जिल्ह्याची चळवळ पोरकी झाली आहे.
सावली तालुक्यात विहिरगाव (बोरमाळा) येथे १२ आॅक्टोबर १९२३ त्यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी राजवटीतही शिक्षणाचे धडे गिरवले. १९३६ मध्ये चंद्रपूर येथील ज्युबली हायस्कूल येथे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रायपूर येथे राजकुमार महाविद्यालयात ‘हाऊ टु रुल’ हे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांचा संबंध भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्याशी आला. दोघांनीही अनेक वर्षे सोबत कार्य केले. १९४२ ला चिमूर येथे बहिणीकडे नागपंचमीला आले होते. त्यावेळी चिमुरात इंग्रजांविरूध्द उठावच्या हालचाली सुरू होत्या. काळे गुरूजी तरूण असल्याने त्यांनीही १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांती लढयात उडी घेतली. या लढ्यात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. या स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याने चिमूर शहराने १९४२ लाच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले. या लढ्याचे काळे गुरूजी प्रत्यक्ष साक्षदार होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काळे गुरूजींनी चिमूरलाच आपली कर्मभूमी मानली.
स्वातंत्र लढ्यातील सहभाग व तल्लक, प्रखर मतवादी विचारामुळे ते चिमुरकरांसाठी एक आदर्श बनले. इंग्रज राजवटीत चिमूर परगणा जिल्हा असल्याचे गुरूजी सांगत. त्यामुळेच त्यांनी चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची चळवळ उभी केली. चिमूर जिल्ह्यासाठी अनेक आंदोलने केली. मोर्चे काढले. निवेदन देवून शासनाचे या मगणीकडे लक्ष वेधले. शासनाने प्रत्येकवेळी आश्वासन दिले. अजूनही चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी अपूर्णच राहिली. त्यांच्या जाण्याने ही चववळ आता पोरकी झाली आहे. काळे गुरूजीच्या मृत्युने चिमूरकरांसह तालुक्याची मोठी हानी झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच झालेल्या १९६२ च्या विधानसभा निवडणुकीला ते सावली मतदार संघातून सामोरे गेले. कार्यकर्त्यांच्या बळावर सायकल व पायी प्रचार यंत्रणा राबवून प्रतिस्पर्धी उमेदवार मा.सा. कन्नमवार यांना जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत ९३० मतांनी कन्नमवार विजयी झाले.काळे गुरूजी यांचा राजकारण हा आवडता विषय. समाजातील नागरिकांच्या समस्या व चिमूर क्रांती जिल्ह्यांची मागणी या विषयावर काळे गुरूजी सभा घेत. सभेत येणाऱ्यांना विनातिकीट प्रवेश वर्ज्य होता. या सभेतून जमा झालेली रक्कम चिमूर क्रांती जिल्ह्याचा आंदोलनासाठी उपयोगात आणायचे. एक रुपया तिकीट असतानाही काळे गुरुजींच्या भाषणाला अफाट गर्दी व्हायची. ‘चिमूरचा आवाज’ साप्ताहिकातून चिमूर क्रांती जिल्ह्याचा आवाज बुलंद केला. ‘गरम सलाख’ हे स्लोगन प्रसिद्ध झाले होते. काळे गुरुजींनी चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीला शासन दरबारी पोहचविण्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढल्या. १९९७ मध्ये जि.प.वर प्रचंड मतांनी निवडून देत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.