रखरखत्या उन्हात बळीराजा शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 01:26 IST2015-05-23T01:26:04+5:302015-05-23T01:26:04+5:30
सतत दोन वर्ष नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी कर्जबाजारी झाला असला तरी निराश झालेला नाही.

रखरखत्या उन्हात बळीराजा शेतात
चंद्रपूर: सतत दोन वर्ष नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी कर्जबाजारी झाला असला तरी निराश झालेला नाही. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस तो बाळगून आहे. पुढील महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मे महिना आता संपायला आला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही सुरू झाली आहे. हंगामपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला. उन्हाची दहाकता या कामात अडथळा आणत असली तरी दुपारचा कालावधी सोडून शेतकरी शेतात रमू लागला आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखविणे सुरू केले. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ असे सातत्याने दोन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये तर खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. मात्र नुकसान टळू शकले नाही.
त्यानंतर आता रबी हंगामात हे नुकसान भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी चांगली पेरणी केली. मात्र यावेळीही पावसानेच शेतकऱ्यांच्या हातचे हिसकावून नेले. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.
निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे सुरू करण्यात आली आहे. यावर्षी एप्रिल आणि चालू मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतात अनावश्यक कचरा वापलेला आहे. तोदेखील काढणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. काही शेतकरी शेतात आधीच शेणखत टाकतात. सध्या सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी)
पावणेपाच
लाखांवर नियोजन
यंदा कृषी विभागाने चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असा अंदाज आहे. यंदा कापसाचा पेरा वाढून एक लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर जाण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर होणार आहे.
पुन्हा कर्जाचे ओझे
मागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. कर्ज डोक्यावर घेऊन पुन्हा शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहे. पुन्हा सावकराच्या दारात शेतकरी उभा ठाकला आहे. कर्जाचे ओझे यावेळी आणखी वाढणार आहे. अशावेळी निसर्गाची कृपा महत्त्वाची राहणार आहे.
बियाणांची स्थिती
कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी ९९ हजार ६५९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यातील १८ हजार ३१४ क्विंटल बियाणे कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. यंदा तीन हजार ३४ क्विंटल कापूस बियाणे लागण्याची शक्यता आहे. मात्र यापैकी आता केवळ ४२७ क्विंटलच बियाणे कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. सोयाबीनचे १४ हजार १४ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे.
खताची स्थिती
यंदा कृषी विभागाने खरिपासाठी एक लाख १० हजार ५० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. शासनाने एक लाख १० हजार २०० मेट्रीक टन खते जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. यातील २४ हजार ७८८ मेट्रिक टन खते कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसात आणखी सात हजार मेट्रिक टन खत येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी सांगितले. खतांची पुढे चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे.