जीव धोक्यात घालून पिकांची राखण
By Admin | Updated: October 12, 2015 01:28 IST2015-10-12T01:28:03+5:302015-10-12T01:28:03+5:30
उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली.

जीव धोक्यात घालून पिकांची राखण
उपाययोजना हवी : अतोनात खर्चानंतरही वन्यप्राणी करीत आहे पिकांना उद्ध्वस्त
प्रकाश काळे गोवरी
उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतीवर अतोनात खर्च केला. उसनवारीने कर्ज घेऊन शेती पिकविली. आता शेतीपिके फळावर आली असताना कपाशी, सोयाबिन, मिरची, तूर पिकात वन्यप्राण्यांचा भरदिवसा शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक चणचण असतानाही मोठ्या मेहनतीने पिक उभे केले. मात्र वन्यप्राण्यांचे कळप शेतात हाती आलेले पिक उद्ध्वस्त करीत आहे. यावर पायाबंद घालण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून बळीराजा शेतपिकांची राखण करीत आहे.
राजुरा तालुक्यातील कोळसा खाण परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले. या ढिगाऱ्यावर काटेरी वनस्पतींनी अतिक्रमण केल्याने झुडपी जंगल निर्माण झाले. ३० वर्षापूर्वी असे जंगल अस्तित्वात नसल्याने वन्यप्राण्यांचा त्यावेळी शेतात धुमाकूळ नसायचा. जंगलातील प्राणी जंगलातच राहायचे. मात्र माणसाने जंगले पूर्णत: नष्ट केल्याने वन्यप्राण्यांनी शेताकडे धाव घेतली.
त्याचा विपरित परिणाम आता शेतीवर होऊ लागला आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी परिसरात वन्यप्राण्यांचा पूर्वी त्रास नसायचा. एखादा वन्यप्राणी शेतात चुकून आलाच तर शेतकरी त्याला हुसकावून लावायचे. मात्र वन्यप्राण्याचा कळपच आता दिवस-रात्र फळावर आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहे. शेतात लावलेल्या कुंपणालाही प्राणी जुमानत नसल्याने शेतकऱ्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शेतात कापूस फुटून आहे. तर सोयाबिन कापणी सुरु आहे. जंगलात वन्यप्राण्यांना खायला काहीच मिळत नसल्याने उभ्या पिकांत धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर पायाबंद घालणारी कोणतीच यंत्रणा शेतकऱ्यांजवळ नाही. त्यामुळे डौलदार पिकांची एका रात्रीतून वाट लावली जात आहे. पिकांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
वन्यप्राण्यांचे कळप माणसाला भीत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पिकांची जोपासना केली तरच मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करता येईल, अशी आस शेतकऱ्यांना आहे. कुटुंबाचा भार पेलताना शेतकऱ्यांची होणारी कसरत काळजाचा ठोका चुकविणारी आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अन्नधान्य पिकवतो. मात्र त्याने पिकविलेली चतकोर भाकरही त्याला खाता येत नाही.
संपूर्ण यंत्रणाच शेतकऱ्यांच्या विरुद्ध उभी ठाकल्याने शेतकरी पूर्णत: हादरुन गेला आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.
एकूण सर्वच परिस्थितीच शेतकऱ्यांसाठी मारक असल्याने हाडाची काडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुठपर्यंत हाल सहन करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतीचा व्यवसायच पार ढासळत चालल्याने आर्थिक चणचणीत सापडलेला शेतकरी परिस्थितीचा गुलाम होऊन जगतो आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबाची होत असलेली ससेहोलपट अनेकांना अस्वस्थ करणारी आहे. मात्र आजवर शासकीय यंत्रणेने यावर कोणताच रामबाण उपाय शोधला नाही. शेतकऱ्यांच्या जीवनाशी चाललेला हा खेळ कधी संपणार आणि कधी शेतकरीदादा सुखाचा अनुभव घेणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.