मुक्या बापाच्या मदतीला सरसावले कोवळे हात!
By Admin | Updated: April 30, 2015 01:21 IST2015-04-30T01:21:25+5:302015-04-30T01:21:25+5:30
कोवळ्या वयातील मुलं काम करताना दिसली की, बालकामगारांना कामावर ठेवले असे वाटते.

मुक्या बापाच्या मदतीला सरसावले कोवळे हात!
नितीन मुसळे सास्ती
कोवळ्या वयातील मुलं काम करताना दिसली की, बालकामगारांना कामावर ठेवले असे वाटते. त्यांना कामावर लावणाऱ्याची चिड येते. मनात राग निर्माण होतो. परंतु दिसणारे चित्र सर्वच ठिकाणी तसेच नसते. कधी कधी वास्तव काही वेगळेच असू शकते. असेच चित्र राजुरा तालुक्यातील पोवनी-चार्ली रस्त्याच्या बांधकामात दगड फोडणाऱ्या लहान-लहान मुलांशी केलेल्या चर्चेतून समोर आले. ते बालकामगार नव्हते तर, आपल्या मुक्या गरीब बापाच्या श्रमाला हातभार लागावा म्हणून दोन्ही मुले दगड फोडण्याच्या कामावर आले होते.
घरात अठराविश्व दारिद्र. हाताला काम जेमतेम; मजुरीही अत्यल्प. सोबत वयोवृद्ध आईवडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार. या सर्वांच्या पोषणाची जबाबदारी मात्र ‘त्या’ मुक्या बापावर ! राबराब राबायचे, हातात भेटेल ते खायचे, माहूरपासून जवळच असलेल्या पोंडूळ या गावातील हनुमंता पवारची अशी ही स्थिती ! घरी जेमतेम पाऊणेतीन एकर शेती. ओलीताची सोय नाही, निसर्गही साथ देत नाही. उत्पन्नच होत नाही. गावपरिसरात कामेही नाही. रोजंदारी नसल्याने आती पैसा नाही. काम मिळालेच तर मजुरीही अत्यल्प. अशा परिस्थितीत नियतीने दिलेले मुकेपण ! दु:ख सांगायचे तरी कुणाला ?
गरीबीने खंगलेले अनेक कुटूंब विदर्भातील रस्ते बांधकामाच्या कामावर येतात. असेच काही कुटुंब राजुरा तालुक्यातील पोवनी-चार्ली रस्ता बांधकामाकरिता आले आहेत. त्यांच्यात हनुमंता पवारही काम करताना दिसत आहे.
हनुमंता पवारच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी, मोठा अकरा वर्षाचा मुलगा अविनाश व लहान नऊ वर्षाचा अक्षय कामावर सोबत आले आहेत. आईवडिल गावाकडे थांबले आहेत. या सर्वांची जबाबदारी मुक्या हनुमंतावर आहे. रस्ता बांधकामात हे कुटुंब दगड फोडण्याचे काम करते. एक ट्रक दगड फोडण्यावर त्यांना ८०० ते एक हजार रुपये मिळतात. त्यासाठी अख्खे कुटुंब काम करते. दिवसभरात किंवा दोन दिवसांत ते एक ट्रकभर दगड फोडतात. घरातील चार व्यक्ती अंगाचे पाणी करतात तेव्हा कुठे घामाच्या मोबदल्यात त्यांना फक्त एक हजार रुपये मिळतात.
आईवडिलांची ही कठोर मेहनत बघून अविनाश व अक्षय यांचे कोवळ हातही अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून जातात. जमेल तेवढे काम ते सुद्धा काम करतात. अविनाश व अक्षय त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, सध्या शाळेला सुट्या लागल्या आहेत. आईवडील काम करतात त्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही काम करतो. वडिलांचे गावाकडे घर बांधण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी पैसा जमविणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना मदत करून त्यांचे स्वप्न पूर्ण करणार आहोत, असे भाऊक उद्गार या मुलांनी काढले.
मुलांबद्दल बोलायला मुक्या बापाकडे शब्द तर बरेच आहेत, पण नियतीने कंठच हिरावला आहे. तरीही, पाणावलेल्या डोळ्यांच्या भाषेतून ते भावना व्यक्त करतात. इच्छा नसूनही मुलांना आणावे लागते. मुलांना नको म्हटलं तरी ते काम करतात. आम्ही कालही दगड फोडत होतो, आजही फोडतच आहोत, परंतु या मुलांनी तरी शिकून काही वेगळे करावे, असे बोल आपसुकच डोळ्यातून प्रगट होतात.