कपाशीवर ‘मर’ रोग
By Admin | Updated: July 24, 2014 23:46 IST2014-07-24T23:46:28+5:302014-07-24T23:46:28+5:30
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते.

कपाशीवर ‘मर’ रोग
शेतकरी चिंतेत : हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांना फटका
प्रविण खिरटकर - वरोरा
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते. मात्र मागील तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. यादरम्यान सुर्याचे दर्शन नसल्याने आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होणे सुरू झाले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कमी खर्चात रोखीचे पीक मानल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाकरिता शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. त्यामध्ये उगवन क्षमता कमी असल्याने शेती पडणार, या भीतीने लागवडी व मशागतीचा खर्च अधिक असतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणणात कपाशीची लागवड केली. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या व्यर्थ गेल्या. त्यानंतर पाऊस आला. त्यात शेतकऱ्यांनी दुबार तर काहिंनी तिबार पेरणी केली. त्यामुळे कपाशीचे पीक कोवळे असतानाच मर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामध्ये कपाशीच्या पिकाचे मूळ कमजोर होते. अन्न द्रव्य मिळत नाही. त्यामुळे रोपाची वाढ होत नाही व झाड कोलमडून जाते. ज्या कपाशीच्या झाडाला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला ते झाड मरत असते.
शेगाव परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्याच्या शेतात मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच कपाशीचे पीक हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कपाशीचे उत्पादन मागील काही वर्षांपासून बऱ्यापैकी होत आहे. परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दर मिळत नाही. परंतु यावर्षी तरी उत्पादन खर्च पेक्षा अधिक दर मिळेल या आशेत शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आता कपाशीवर मर रोगाने प्रादूर्भाव करणे सुरू केल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला असल्याचे दिसून येते. मागील वर्षीही अतिवृष्टी होऊन वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आताही तसेच होत आहे.