बसस्थानकातील प्रवासी आवारात बस शिरली
By Admin | Updated: June 2, 2014 01:00 IST2014-06-02T01:00:30+5:302014-06-02T01:00:30+5:30
येथील बसस्थानकातील प्रवासी आवारासमोर एसटी लावण्याच्या बेतात ...

बसस्थानकातील प्रवासी आवारात बस शिरली
भद्रावती : येथील बसस्थानकातील प्रवासी आवारासमोर एसटी लावण्याच्या बेतात असलेल्या एसटी चालकाने भरधाव बस स्टंटबाजी करीत बसस्थानकामधील प्रथम कक्षामध्ये शिरवली. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या गोंधळात दोघे बसखाली सापडून जखमी झाले. चालकाच्या डोक्यालासुद्धा गंभीर दुखापत झाली. यातील एक जण गंभीर जखमी असून त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना आज रविवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. सध्या लग्नसराई असल्याने आज बसस्थानकात प्रवाशांची संख्या जास्त प्रमाणात होती. कक्ष क्र. १ मध्ये बसच्या प्रतीक्षेत असताना हिंगणघाट आगाराची बस (एमएच २0- ९१४३) चालक ए.एस. आत्राम याने भरधाव वेगात स्थानकात उभी करण्याऐवजी ती थेट प्रवाशी बसलेल्या आवारासमोर प्लॅटफार्मवरून सरळ कक्षात घुसवली. या कक्षात असणारे प्रवाशी सैरावैरा पळाले. मात्र यात चिमूरकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असणारे राहुल रामलाल चिंचोलकर (१७), भगवान रमाजी कडूकर (५५) रा. मनेमोहारी (चिमूर), चालक ए.एस. आत्राम जखमी झाले. यातील राहुल याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना पाहून संतप्त नागरिकांनी एस.टी. चालकावर हल्ला चढविला. संतप्त नागरिकांचा जमाव पाहता भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)