जुगनाळा ग्रा.पं.ला जिल्ह्यातून प्रथम आदर्श ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:11 IST2019-02-22T00:03:49+5:302019-02-22T00:11:28+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला.

जुगनाळा ग्रा.पं.ला जिल्ह्यातून प्रथम आदर्श ग्राम पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला.
गुरुवारी पोंभूर्णा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आ. नाना शामकुळे, आ. सुरेश धानोरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे , सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदर्श गावे तयार करण्यासाठी केवळ योजना व निधीच लागत नाही तर माझ्या गावाचे नंदनवन मीच करणार, असा दृढनिश्चय लागतो. पालकमंत्री म्हणून अशा दृढनिश्चयी सरपंचाच्या मागे ताकदीने उभा आहे. प्रत्येक सरपंचाने आपल्या अधिकाराची किमान जाणीव ठेवावी, सरपंच रडणारा नव्हे गावासाठी लढणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ना. हंसराज अहीर म्हणाले, शेतकरी शेतमजूर व गरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने उपयोग गावाच्या कल्याणाकरिता करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना केले. गावाच्या विकासासाठी विशेष चुणूक दाखवणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांचा यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श ग्राम म्हणून जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार जुगनाळा ग्रामपंचायतीला देण्यात आला. जुगनाळाचे सरपंच गोपाल ठाकरे, ग्रामसेवक शमा नान्होरीकर, उपसरपंच प्रमोद धोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.