दीनदुबळ्यांची सेवा केल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:13 IST2019-07-08T00:12:34+5:302019-07-08T00:13:04+5:30
जात, धर्म बाजूला ठेवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यसेवेला बळकटी आणण्याचे कार्य प्रत्यक्ष हातून होत आहे, हा आनंद न मोजण्यासारखा आहे, अशी भावना राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

दीनदुबळ्यांची सेवा केल्याचा आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जात, धर्म बाजूला ठेवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यसेवेला बळकटी आणण्याचे कार्य प्रत्यक्ष हातून होत आहे, हा आनंद न मोजण्यासारखा आहे, अशी भावना राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
चिचपल्ली येथे शनिवारी आयोजित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळादरम्यान ते बोलत होते. चिचपल्ली हे गाव बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आले असून या गावाचा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या गावाने नेहमी भरभरून प्रेम दिले असून गावाच्या विकासासाठी नेहमी उपक्रम राबवलेले आहे. यात वृद्धांना चष्मे वाटप केले, आरोग्य शिबिर राबविले, विवाह सोहळे सर्वच सार्वजनिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. या अर्थसंकल्पात संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना याअंतर्गत मिळणारे मानधन वाढविले असून राज्यातील विधवा, निराधार, घटस्फोटिता महिलांचेसुद्धा मानधन वाढवलेले आहे. हे मानधन वेळेवर मिळावे, याकरिता शासन निर्णय काढणार असून विशेष अर्थसहाय्य विभागाचा कारभार मुख्यमंत्र्यांनी आजच माझ्याकडे सोपविला असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदिवासींची सेवा करणार, असेही ते म्हणाले.
पालकमंत्र्यांचा सत्कार
गावकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता-ममता-बंधुता या तत्वानुसार काम केल्यास हे गाव विकासात अग्रेसर राहील, म्हणून येथील गावकऱ्यांनी माणुसकी जपत नातं घट्ट करीत एकमेकांचे अश्रू पुसत गावाचा विकास साधावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, महानगरपालिकेचे नगरसेवक रामपाल सिंग, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोटे, दयानंद बंकूवाले, माजी सभापती देवानंद थोरात, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमान काकडे, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष इम्रान पठाण, सरपंच श्रीकांत बावणे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.