नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संयुक्त पथके करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:45+5:302021-01-02T04:24:45+5:30
चंद्रपूर : नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे धोके लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्थांचे संयुक्त पथके तयार ...

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संयुक्त पथके करणार कारवाई
चंद्रपूर : नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे धोके लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्थांचे संयुक्त पथके तयार करण्याचा निर्णय उपायुक्त विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उपायुक्त वाघ म्हणाले, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नायलॉन मांजाची विक्री करून इतरांना वेदना देणे हा घृणास्पद प्रकार आहे. आर्थिक फायद्यांकडे बघून नायलॉन मांजा छुप्या मार्गाने विकणाऱ्या विक्रेत्यांनी लोकांच्या जीवाचा विचार करावा. पालकांनी मुलांना मांजापासून परावृत्त करावे, असे आवाहन उपायुक्त वाघ यांनी केले. नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास तुरुंगवासाचीही तरतूद आहे. केवळ विक्रीची ठिकाणे नाही तर गोदाम, साठवणुकीची ठिकाणे, घरून विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. व्यावसायिक व नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री करणाऱ्यांची माहिती मनपास द्यावी, त्यावर उचित कारवाई करण्याचे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, मनपा सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर व रामनगर, इको प्रो प्रतिनिधी, स्वच्छता विभाग प्रमुख व सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
पथकात सात जणांचा समावेश
मांजा वापरावर निर्बंध यावेत, यासाठी महानगरपालिका तपासणी सुरू करणार आहे. मनपा, पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्या सात कर्मचाऱ्यांचे तीन संयुक्त पथके तयार करण्यात आली.