व्यवसाय बंद किराया चालू : व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी
चंद्रपूर : मागील वर्षी अनेक दिवस व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे आर्थिक चणचण भासत होती. परंतु, त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ब्रेक द चेनअंतर्गत पुन्हा व्यवसाय बंद करावा लागला आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचे पैसे, कर्जाचे थकीत हप्ते, दुकानाचा किराया द्यायचा कसा? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडत आहे. अनेकांना दगिने विकायची वेळ आली असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर परिस्थिती निवडत असताना पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने ब्रेक द चेन उपक्रमांतर्गत जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. उन्हाळा असल्याने अनेक दुकानदारांनी माल बोलवला होता. मात्र ऐन सिजनमध्येच पुन्हा दुकाने बंद असल्याने अडचणी भासत आहेत. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सर्व जमापुंजी संपली. आता दुकानाचा किराया, व्यापाऱ्याचे पैसे, घरगुती अडचणी, कर्जाचे हप्ते कसे भरायचा? असा प्रश्न अनेक व्यावसायिकांना बसत आहे. अनेकांना तर पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे, तर काहीजण दागिनेसुद्धा तारण म्हणून ठेवत आहेत.
बॉक्स
दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय कर्ज फेडायचे कसे
मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनंतर रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर व्यवसाय सुरू झाले होते. परंतु, दोन महिने न होताच पुन्हा दुकाने बंद करण्याचा आदेश धडकला. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडत आहे. कर्जावरील व्याज वाढत आहे. दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे.
बॉक्स
सततच्या लॉकडाऊनने तणाव वाढतोय
लॉकडाऊनने व्यवसाय डबघाईस आला आहे. मागील लॉकडाऊनमध्ये जमापुंजी संपली. आता पुन्हा ब्रेक द चेनअंतर्गत दुकाने बंद असल्याने अडचणी भासत आहेत. घरखर्च चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
-पूजा गेडाम, गृहिणी
हातगाडीवर इडली, सांभार विकून उदरनिर्वाह सुरू होता. मागील वर्षीपासून लॉकडाऊनचे संकट आले. त्यामुळे आर्थिक अडचण भासत आहे. शासनाकडून कुठलीही मदत नाही, कुटुंब चालवायचे कसे, जीवनावश्यक वस्तूचे दरसुद्धा वाढले आहेत.
शालिनी रामटेके, गृहिणी
---
पूर्वी आर्थिक अडचणी. त्यातही हा लॉकडाऊन. त्यामुळे घरखर्च चालवायचा कसा, मुलाचे शिक्षण, घराचा किराया, दुकानाचा किराया, मानसाचे वेतन द्यायचे कुठून? असा प्रश्न उभा ठाकतो. त्यात शासनाने ना टॅक्स कमी केला, ना वीजबिल माफ केले. जगायचे कसा? असा प्रश्न आहे.
-श्यामली वर्मा, गृहिणी