शेती सोडून दिलेलीच बरी, मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST2022-03-25T05:00:00+5:302022-03-25T05:00:40+5:30
इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापूस तसेच सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल; मात्र उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना फारसा फायदा झालेलाच नाही.

शेती सोडून दिलेलीच बरी, मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढले आहेत. त्यामुळे यंत्राद्वारे शेती करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. दुसरीकडे मजुरांना दिवसाचे ५०० रुपये देऊन ते शेतात काम करण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. शहरातील आणि सावलीतील काम करण्याकडेच त्यांचे लक्ष आहे. त्यामुळे शेती सोडून दिलेलीच बरी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यावर्षी कापूस तसेच सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल; मात्र उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना फारसा फायदा झालेलाच नाही. त्यामुळे नापिकीला शेतकरी कंटाळले आहे. त्यातच सातत्याने वाढणाऱ्या भाववाढीमुळे शेती व्यवसाय करणे सोडून द्यावे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
वर्षभरात ट्रॅक्टर मशागत दुप्पट
- मागील वर्षी शेतकऱ्यांनी एकरी ५०० ते ६०० रुपये नांगरणीसाठी दिले होते. यावर्षी मात्र १००० रुपये एकर नांगरणीचे दर आकारले जात आहे.
दिवसाला ५०० रुपये, तरी मजूर मिळेना
n सध्या स्थितीत दिवसाला ५०० रुपये मजुरी देऊन मजूर मिळत नसल्याची स्थिती ग्रामीण भागात आहे. उन्हात काम नको म्हणत अनेकजण मजूरी टाळत आहे.
शेतकरी म्हणतात...
दिवसेंदिवस शेती करणे कठीण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. दुसरीकडे टॅक्टर तसेच आधुनिक यंत्रांनी शेती करण्याचा प्रयत्न केला तर डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे काय करावे, समजत नाही. उत्पादनापेक्षा खर्च अधिक, अशी अवस्था आहे.
-संबाशीव जुनघरी
आता नाइलाजाने शेती करावी लागत आहे. उन्हातान्हात काम करून शेती करायची, निसर्गाने साथ दिली तर ठीक, नाही तर पुन्हा कर्जबाजारी होऊन पेरणी करायची. आता तर शेतमजूर मिळत नाही. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरवाल्यांनीही आपले दर वाढविले आहेत.
-ज्ञानेश्वर बोबडे
डिझेलचे भाव वाढले, आम्ही काय करणार?
पूर्वी डिझेलचे दर कमी होते. त्यामुळे ट्रॅक्टर तसेच इतर साधनांचे दर कमी होते. आता डिझेलचे दर वाढल्यामुळे पूर्वीसारखे दर देणे परवडत नाही. आम्हाचाही नाइलाच झाला आहे. घडाईपेक्षा मळाई जास्त असल्यासारखी स्थिती आहे.
-रूपेश कोटकर
मागील वर्षी डिझेल, पेट्रोलचे दर सातत्याने वाढले आहे. त्यामुळे शेतीकाम तसेच इतर कामाचेही दर वाढविण्यात आले आहे. परवडत नसल्याने हे दर वाढविण्यात आले आहे.
-रत्नाकर माकोडे