लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान व योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरवशाली इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोप करत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता चंद्रपूर येथील जटपुरा गेटजवळ महात्मा गांधी पुतळ्यापुढे भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या सन्मानपत्रांच्या प्रतींची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला संजय वैद्य, महेश काहिलकर, दिवाकर बनकर, राजू काहिलकर आदींची उपस्थिती होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्मारकांची दुरवस्था, तसेच हयात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची प्रशासनाकडून होणारी अवहेलना ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी म्हटले आहे.
सरकारने उपेक्षा केल्याचा आरोप९ ऑगस्टला 'ऑगस्ट क्रांती दिन' होता, जो स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो; पण तो साजरा करण्यास सरकारकडून कुठलाही प्रयत्न केला गेला नसल्याचे सांगून गांधी पर्वाच्या समाप्तीचा प्रयत्न सरकार करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यामुळे व्यथित झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी स्वतःच्या पालकांना मिळालेल्या भारत सरकारच्या सन्मानपत्रांची होळी करून सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.