माती कलेचा आविष्कार कालबाह्य
By Admin | Updated: February 8, 2015 23:31 IST2015-02-08T23:31:23+5:302015-02-08T23:31:23+5:30
श्रमाने मातीचेही सोने बनते तर श्रमावाचून सोन्याचीही माती होते, हाच प्रत्यय भद्रावती येथील परंपरागत व्यवसायाबाबत आज अनुभवायला मिळत आहे. ज्या व्यवसायांसाठी भद्रावती सर्वत्र प्रसिद्ध होती

माती कलेचा आविष्कार कालबाह्य
सचिन सरपटवार - भद्रावती
श्रमाने मातीचेही सोने बनते तर श्रमावाचून सोन्याचीही माती होते, हाच प्रत्यय भद्रावती येथील परंपरागत व्यवसायाबाबत आज अनुभवायला मिळत आहे. ज्या व्यवसायांसाठी भद्रावती सर्वत्र प्रसिद्ध होती तेच व्यवसाय आता फक्त आठवणीतले होत आहे. यातीलच एक व्यवसाय म्हणजे येथील कुंभार समाजाचा व्यवसाय. मात्र मातीचा हा कलाअविष्कार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
बदलत्या आधुनिक यंत्रयुगात कुंभार समाजाची उदरभरणाची साधणे कालाबाह्य झाल्यामुळे या समाजासमोर जीवन जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने या समाजाकडे लक्ष न दिल्यामुळे आता कुंभार समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. हा समाज आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या मागास राहिलेला आहे. कुंभार समाजाच्या व्यवसायाबाबत शासनाने आपले धोरण शिथिल केल्यास हा व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो.
कुंभार समाजाच्या अद्वितीय कलाकृतीचा अविष्कार म्हणजे मातीच्या गोळ्यापासून तयार केलेल्या वस्तु. परंतु, आज तलावातून ही माती सुद्धा त्यांना विकत घ्यावी लागत आहे. भद्रावतीत कुंभार समाजाची जवळपास १२५ ते १४० घर आहेत. मातीपासून माठ, राजन, कुंड्या, सुरई, दिवा लावणी, तावे, गाडगं, येरणी, स्वयंपाकासाठी तपिल, भाकरीसाठी खापर (तावा), मूर्ती, मातीचे हत्ती, आसनिस्या भुलई इत्यादी वस्तु तयार करुन हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहे. परंतु आज प्लॉस्टिक स्टील, फायबर वस्तुंनी या व्यवसायावर संक्रात आणली आहे.
भद्रावतीत अनेक पिढ्यांपासून कुंभार समाज हा व्यवसाय करीत आहे. प्रत्येकाच्या घरात, अंगणात, खुल्या जागेवर थरावर मातीच्या तयार केलेल्या वस्तू दिसतात. मातीच्या वस्तू भाजणे, पक्क्या करणे व बाजारात विक्रीला नेणे हा सुरुवातीला जणुकाही नित्यनियम होता. पहिल टोपल्यात वस्तू टाकूण डोक्यावर नेणे नंतर गाढव व बैलबंडीवर तर आता वाहनांत या वस्तू विक्रीस आणल्या जातात. गवराळा तसेच पिंडोणी बोडीतून काळी माती आणली जात होती. आता हिच माती कुंभारांना विकत घ्यावी लागत आहे. तसेच भट्टीसाठी लागणाऱ्या काड्याही उपलब्ध नाही. यावर बंदी असल्याने व्यवसाय करावा तर कसा, हा प्रश्न समाजबांधवांसमोर आहे.