दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटली विलोभनीय चित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:33+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय या विशेष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत. परंतु, त्यांना आकार देण्याची गरज आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटली विलोभनीय चित्रे
सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : आनंदवन वरोरा येथील अंध विद्यालयात कार्यरत कला शिक्षक परमानंद तिराणिक यांनी दिव्यांग मुलांनी काढावी आणि चित्रप्रदर्शनी अनुभवावी, अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण प्रयोग केला. या प्रयोगाला या मुलांनी उत्तम प्रतिसाद देऊन देखणी विलोभनीय चित्रे रेखाटल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय झाला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रतिभा तेजस्वी व्हावी, त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी, यासाठी कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे २० वर्षांपासून निरनिराळे प्रयोग करीत आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे तारेवरची कसरतच. गायन, वादन व हस्तकला हे विषय या विशेष विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत. परंतु, त्यांना आकार देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले कसे चित्र काढतील, कसे चित्रप्रदर्शनी अनुभवतील यासाठी तिराणिक यांनी दिव्यांग मुलांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या सर्व हालचाली टिपल्या. त्यांच्या गुणांना दिशा दिली. विविध प्रयोगाच्या माध्यमातून वासावरून फुल ओळखण्याची कला विद्यार्थ्यांनी अवगत केली. हळूहळू फुलांचा रंग कळू लागला. विविध फळे विद्यार्थ्यांना चाखायला दिली. संत्रा व केळी फळांच्या माध्यमातून फळांचा आकार विद्यार्थ्यांना समजु लागला. संत्रांचा आकार चेंडूसारखा आणि केळीचा आकार विटीसारखा हे उत्तर विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळाले. त्यांना ड्रार्इंग पेपर देण्यात आले. विद्यार्थी त्यावर वेगवेगळ्या आकार काढू लागले. फुले, पक्षी, घरांची चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे ही मुले कॅन्व्हासवर कसे चित्र रेखाटणार, याची उत्सुकता होता. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना नागपूर येथे प्रदर्शनी पाहण्यास नेण्यात आले. दिव्यांग मुलांसाठी आयोजित केलेले भारतातील ते पहिले प्रदर्शन होते. या प्रदर्शनीतूनही मार्गदर्शन मिळाले. चित्रप्रदर्शन पाहताना भिंतीवरती टांगलेल्या चित्रातील अंध मुलगी आपल्याशी संवाद साधू पाहते, हा प्रसंग खूप काही सांगणारा होता. तिराणिक यांचा हा प्रयोग दिव्यांगांना संजिवनी देणारा ठरला आहे. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास कलावंत म्हणून ठसा उमटवू शकतात.
दृष्टीहीन विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक बांधिलकीची गरज आहे. त्यांच्यातील सुप्त कलागुण ओळखून दिल्यास कला समृद्ध होते. दिव्यांग मुलांच्या विशेष शिक्षणात कलेला अत्यंत महत्त्व असल्याने शिक्षक, पालक व समाजाने त्यांची संवेदनशीलता ओळखण्याची गरज आहे.
-परमानंद तिराणिक, कलाशिक्षक