वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:24+5:302021-03-07T04:24:24+5:30
विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा ...

वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश
विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला महाराष्ट्रात विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी विषयाबाबत सविस्तर भूमिका विषद केली. सदर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणीच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित विमानतळाच्या विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव नियमानुसार शासनाला सादर करण्यात आला आहे, परंतु हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे वनविभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात सदर विमानतळाची उभारणी झाल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. या जिल्ह्यात सैनिक शाळा उभारली आहे. त्यामुळे डिफेन्सशी संबंधित कार्यवाहीला सुद्धा यामुळे गती मिळेल. यादृष्टीने याबाबत फेरप्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. सदर प्रकरणी त्वरित फेरप्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या दृष्टीने संबंधित नस्ती मुख्यमंत्र्यांकडे पुनःश्च सादर करावी, व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांना याबाबत विनंती करू, असे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.