वाघपीडित गावाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By Admin | Updated: August 7, 2014 23:52 IST2014-08-07T23:52:19+5:302014-08-07T23:52:19+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम या वाघपीडित गावाला आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी चर्चाही केली. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल,

Inspector of Waghpidit village collectors | वाघपीडित गावाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

वाघपीडित गावाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

गावकरी दहशतीतच : नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम या वाघपीडित गावाला आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी चर्चाही केली. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.
२५ जुलै रोजी वाघाच्या हल्ल्यात घनोेटी तुकूम येथील पांडुरंग दोनू आत्राम या नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावास भेट दिली. यापूर्वी या परिसरात वाघाच्या हल्ल्यात देवई येथील वत्सलाबाई शेडमाके या महिलेचा मृत्यू झाला होता.
घनोेटी तुकूम येथील समाज भवन येथे त्यांनी पांडुरंग आत्राम यांच्या पत्नी ताराबाई, मुलगा पुरुषोत्तम व सरपंच सातपुते व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या ४० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या ५ चमू तयार करण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून वाघ कोणत्याही क्षणी पकडल्या जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी गावकऱ्यांनी मदत व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळालासुद्धा भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत भवन येथे राहण्याची सोय गावकऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Inspector of Waghpidit village collectors