संस्था चालकाची तत्काळ चौकशी करा - मुनगंटीवार

By Admin | Updated: August 17, 2015 00:45 IST2015-08-17T00:45:17+5:302015-08-17T00:45:17+5:30

विठ्ठल जाधव कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा ता. जिवती येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची मागणी केल्यामुळे संस्था चालकांनी.....

Inquire about the institute driver immediately - Mungantiwar | संस्था चालकाची तत्काळ चौकशी करा - मुनगंटीवार

संस्था चालकाची तत्काळ चौकशी करा - मुनगंटीवार

चंद्रपूर : विठ्ठल जाधव कनिष्ठ महाविद्यालय दमपूर मौदा ता. जिवती येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची मागणी केल्यामुळे संस्था चालकांनी त्यांना धमकी दिली असता विद्यार्थ्यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन संस्था चालक व मुख्याध्यापकाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले. आज सामान्य रुग्णालयात या विद्यार्थ्यांची पालकमंत्री यांनी भेट घेतली.
यावेळी त्यांच्या सोबत आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर व सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
दमपूर मौदा येथील विठ्ठल जाधव कनिष्ठ महाविद्यालयातील प्रेमदास आडे, प्रवीण जाधव, प्रफुल राठोड, क्रिष्णा राठोड या विद्यार्थ्यांनी आज विष प्राशन केल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची पालकमंत्री मुनगंटीवार यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, ही घटना दुु:खद असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. उमरखेड, किनवट व नांदेड भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी जिवती येथे आले असून त्यांची मागणी केवळ शिक्षक पुरविण्याची होती. असे असताना त्यांना धमकी देणे ही गंभीर बाब असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, असे निर्देश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, वसतिगृह, आश्रमशाळा यांच्या तपासणीचे आदेशही त्यांनी दिले.

Web Title: Inquire about the institute driver immediately - Mungantiwar