पोलिसांवर वाढला कामाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे, नाकाबंदी, गर्दीचे व्यवस्थापन, ...

पोलिसांवर वाढला कामाचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे, नाकाबंदी, गर्दीचे व्यवस्थापन, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेला परिसर सील करणे आदी कामांचा भार आधीच पोलीस प्रशासनावर आहे. त्यातच ठिकठिकाणी अडकलेले मजूर व कामगार आपआपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवतांना पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आहे.
मागील काही दिवसांत परप्रांतीय मजुरांची पाठवणी आणि त्यांचे पास व नोंदणी कागदपत्रे तपासणी करणे, त्यात नव्याने भर म्हणून सोमवारपासून आधीच बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांना विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना एसटीने पाठविण्याची जबाबदारी देखील आहे. या अतिरिक्त कामामुळे पोलिसांवर कामाचा ताण व व्याप वाढू लागला आहे. त्यातच बुधवारी बिनबा गेट परिसरात एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे बिनबा गेट परिसर सील करण्यात आला. तसेच त्या परिसरात येणाºया जाणाºया नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, रामनगर आदी परिसरात पोलीस चौकी लावून तैनात आहेत. येणाºया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करीत आहेत. विनाआवश्यक बाहेर पडणाऱ्यांवर दंड वसूल करण्यात येत आहे.
कर्तव्य व कौटुंबिक जबाबदारी पेलताना कसरत
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करताना सध्या पोलिसांना रात्रदिवस डोळ्यात तेल घालून काम करावे लागत आहे. त्यातच पोलीस कर्मचाºयांनाही कोरोनाबाधेची चिंता सतावत असल्याने त्यांना त्यांच्या आरोग्यासाठीही जपावे लागत आहे.
कोरोनाच्या लढ्यात पोलीस जीवाची बाजी लावून काम करत असून परराज्यात किंवा जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी पास मंजूर करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. स्थानकाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही असतो. आपले कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पेलताना पोलिसांची कसरत होत आहे. तरीसुद्धा पोलीस चोख कर्तव्य बजावत आहेत.