सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:00:44+5:30

सोशल मीडिया लहान-थोरांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकण्याचे फॅड वाढत आहे. मात्र, असे प्रकार अनेकांच्या अंगलट येत असून जेलची हवा खावी लागत आहे.

Increased hooliganism on social media | सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्याच्या नादात अनेकजण तलवारीने केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अशा प्रकाराचे व्हिडिओ अंगलट येऊन व्हिडिओ टाकणाऱ्यांना जेलची हवा खावी लागत आहे.  
सोशल मीडिया लहान-थोरांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकण्याचे फॅड वाढत आहे. मात्र, असे प्रकार अनेकांच्या अंगलट येत असून जेलची हवा खावी लागत आहे. त्यामुळे केवळ लाईक्स व कमेंट्सच्या उत्सुकतेपोटी व्हिडिओ करणे टाळावे.

तलवारीने केक कापण्याची फॅशन
मित्रमंडळीत एखाद्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण केक कापताना चाकूऐवजी तलवारीचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यानंतर हातात तलवार घेऊन नाचताना व्हिडिओ बनवितात. सध्या अशी फॅशनच झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे प्रकार चुकीचे असून पोलिसांना कळल्यास आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

बल्लारपुरात गुन्हा दाखल
वाढदिवसाचा केक तलवारीने कापून व्हिडिओ व्हायरल करण्याप्रकरणी नुकताच बल्लारपूर येथे आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविण्याचा व्हिडिओसुद्धा पसरविणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली. 

कट्टा, तलवार अन् चाकू
नव्यानेच तारुण्यात आलेले अनेकजण हातात बंदूक, तलवार आणि चाकू बाळगत आहेत. शस्त्र हातात घेऊन ते आपली छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. अशाप्रकारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आहेत.

कमेंट करताना काळजी घ्यावी
सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या गुंडांच्या पोस्टला लाईक किंवा त्यावर कमेंट करणारेसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या वादगस्त व भाईगिरीच्या पोस्टला लाईक किंवा शेअर करताना काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या पोस्टपासून दूर असलेलेच बरे. 

 

Web Title: Increased hooliganism on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.