वरोरा : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाजारात येत आहेत. मात्र वाहने रस्त्यावरच ठेवत असल्याने अडचणी वाढत आहेत.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार
वरोरा : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. अनेक ग्रामीण भागातील प्रस्ताव सादर करण्यात आल्याने समस्या सुटणार आहेत.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
सावली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच सावलीतील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रबी पिकाची तयारी करीत आहे. अशा वेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या
टेमुर्डा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
रोजगार हमीची कामे सुरू करावी
चिमूर : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. कामे सुरू करण्याची मागणी आहे.
बेरोगार युवकांसाठी कर्ज योजना
नागभीड : राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतींकरिता स्वयंरोजगारासाठी कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय वा सेवा उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविण्यात येत आहे.
तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था जैसे थे आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात असून दुरुस्तीची मागणी आहे.
जिल्ह्यातील सौरदिवे दुरुस्त करावे
भद्रावती : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरु केले. मात्र यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहे. दरम्यान, काही सौर दिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त
वरोरा : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा.
बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
शौचालयांचा वापर सरपण ठेवण्यासाठी
जिवती : परिसरातील अनेक गावात गोवºया, सरपणाची लाकडे, निरूपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे. त्यामुळे गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून अधिकाधिक जनजागृती करणे गरजेचे आहे.