वाढीव दराने मानधन देणार

By Admin | Updated: August 24, 2015 01:07 IST2015-08-24T01:07:12+5:302015-08-24T01:07:12+5:30

अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी गांधी चौकातून अरूण लाटकर, वामन बुटले, एस.एच. बेग यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

Increase the honorary rate | वाढीव दराने मानधन देणार

वाढीव दराने मानधन देणार

अंगणवाडी महिलांचा मोर्चा : सुधीर मुनगंटीवार यांचे अंगणवाडी महिलांना आश्वासन
चंद्रपूर : अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी गांधी चौकातून अरूण लाटकर, वामन बुटले, एस.एच. बेग यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोर्चाला भेट देत अंगणवाडी महिलांना वाढीव दराने मानधन देण्याचे आश्वासन दिले.
मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रत्यक्ष येऊन अंगणवाडी महिलांच्या मागण्याला पाठिंबा दिला. आम्हीदेखील अंगणवाडी महिलांच्या आंदोलनाच्या पाठिशी आहो, असे त्यांनी अंगणवाडी महिलांना आश्वासन दिले. मोर्चा मुख्य मार्गाने निघाला. ‘हिंदू मुस्लीम सिख इसाई हम सब भाई भाई’, ‘जात पात धर्म का झगडा नही चलेगा नही चलेगा’, ‘सबका खुन लाल है एकता की मिसाल है’, ‘संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है’, ‘अंगणवाडी महिलांना न्याय मिळालाच पाहिजे’ आदी घोषणा देत मोर्चा नागपूर रोडवरील विश्रामगृहात पोहोचला. मोर्चात तीन हजाराहून जास्त अंगणवाडी महिला तसेच आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या वेळेनुसार त्यांचे आगमन झाले. त्यावेळी सिटूचे नेते प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, अंगणवाडी महिलांना मिळालेले वाढीव मानधन तत्कालीन सरकारने मेहरबानी म्हणून दिले नाही तर आम्ही ते लढा करून मिळविले आहे. १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ मिळाली पाहिजे, घोषीत केल्यानुसार सेवानिवृत्तीचा लाभ तसेच दिवाळी भेट मिळाली पाहिजे. आशा वर्करला डीलेव्हरीचा लाभ देताना एपीएल बिपीएल भेद करण्यात येवू नये, आशा वर्करला दिल्या जाणाऱ्या मोबदलत्यात वाढ करण्यात यावी, अभयअरण्यात काम करणाऱ्या गाईडला निश्चित मानधन देण्यात यावे आदी मागण्या मांडल्या व मागण्याचे निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. मोर्चेकऱ्याच्या जनसमुदायासमोर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आपल्या मागणीला मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली असून १ एप्रिल २०१४ पासून मानधन देण्यात येईल. दिवाळी भेटीकरिता अनुदान नुकतेच मंजूर करण्यात आले आहे. ज्या अंगणवाडी महिला सेवानिवृत्त झाल्या, त्यांना घोषीत केल्यानुसार सेवानिवृत्तीचा लाभ देण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याच प्रमाणे आशा वर्करच्या मागण्यांचादेखील सहानुभूतीपुर्वक विचार करण्यात येईल. तसेच अभयअरण्यातील गाईड्सला निश्चित असे मानधन देण्याचे दृष्टीने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, देवराव भोंगडे हेदेखील उपस्थित होते. आयोजित मोर्चाला महाराष्ट्र लोकशाही आघाडीने आपला सक्रिय पाठिंबा दिला होता व मोर्चात अंकुश वाघमारे, शेख मैकु शहाबुद्दीन, किशोर पोतनवार, खुशाल तेलंग, नथमल सोनी, रामकुमार आकापेल्लीवार, अयुब कच्ची, प्रा. एस.टी. चिकटे, नामदेव कन्नाके, पी.एम. जाधव, गोविंद मिश्रा, सुरेश यस्कडे, राजेश पिंजरकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आभार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा शोभा बोगावार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Increase the honorary rate