निराधारांच्या अनुदानात वाढ करा
By Admin | Updated: September 6, 2014 01:44 IST2014-09-06T01:44:27+5:302014-09-06T01:44:27+5:30
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उपेक्षित समाज घटकाला आधार देण्यासाठी विविध योजना राबवित आहे.

निराधारांच्या अनुदानात वाढ करा
बल्लारपूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने उपेक्षित समाज घटकाला आधार देण्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र, लाभार्थ्यांना अत्यल्प अनुदान देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम यांनी समितीच्या मासिक सभेत ठेवला. बल्लारपूर पंचायत समितीने ठराव पारित करून शासनाकडे पाठविला आहे.
बल्लारपूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती अॅड. हरिश गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेला उपसभापती सुमन लोहे, पंचायत समिती सदस्य अनेकश्वर मेश्राम, चंद्रकला बोबाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सभेत निराधार अनुदान योजनेवर चर्चा करण्यात आली. निराधार, दुर्बल व निरक्षर लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनेतील अनुदान अल्प प्रमाणात आहे, यात त्वरीत वाढ करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गरिबांना दिलासा देण्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, निवृत्तीवेतन, राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राबवित आहे. या अनुदान योजनेनुसार लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये अनुदान वाटप केले जाते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या काळात हे अनुदान नाममात्र आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत अपंग, आजारग्रस्त यांना ६०० रुपयांऐवजी एक हजार रुपये व विधवांनादीड हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडला. (शहर प्रतिनिधी)