ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून उत्साह वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:46+5:302021-02-05T07:40:46+5:30
चंद्रपूर : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूह महिलांना रोजगार व स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद ...

ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून उत्साह वाढवा
चंद्रपूर : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूह महिलांना रोजगार व स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद परिसर, पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे हिराई रुरल मार्ट, तर बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे घरकुल मार्ट सुरू झाले. ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या जीवनोपयोगी उत्पादनांची वस्तूंची खरेदी करून उत्साह वाढवा, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जिल्ह्यात १८ हजार समूह कार्यरत आहे. प्रशिक्षणामुळे शेतीसह अनेक समूह लहान उद्योगांकडे वळले आहेत. स्थानिक स्तरावरील संसाधने वापरून खाद्यश्रेणीतील पदार्थ, शोभिवंत वस्तू आदी तयार केल्या जात आहेत. या उत्पादनांना उमेद अभियानाकडून 'हिराई' या नावाने बाजारात आणले जात आहे. बुधवारी चंद्रपूर येथील मार्टचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. यावेळी अभियान सहसंचालक शंकर किरवे, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, सभापती सुनील उरकुडे, सभापती राजू गायकवाड, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष ब्रह्मपुरीतर्फे पंचायत समिती येथील हिराई रूरल मार्टचे उद्घाटन सभापती दोनाडकर यांनी केले. यावेळी उपसभापती ठवरे, संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर, भस्मे, तालुका अभियान व्यवस्थापक जांभूळकर व उमेद कर्मचारी उपस्थित होते. नांदगाव पोडे येथील आनंद ग्रामसंघाद्वारे संचालित घरकुल मार्ट चे उदघाटन झाले. यावेळी सभापती इंदिरा पिपरे, गटविकास अधिकारी कळसे, प्रशासक पद्मगिरीवार, जि.प. सदस्य हरीश गेडाम, माजी सभापती गोविंदा पोडे, प्रभागसंघ अध्यक्ष. प्राची कोंडगुरला, मोझरकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी माधुरी मुके, तालुका व्यवस्थापक उमप माउलीकर, सुकेशीनी गणवीर आदींनी सहकार्य केले.