धान उत्पादकांच्या नशिबी उपेक्षा
By Admin | Updated: August 3, 2014 00:02 IST2014-08-03T00:02:32+5:302014-08-03T00:02:32+5:30
देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला उपेक्षित जीवन जगत आहे. तालुक्याला धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या

धान उत्पादकांच्या नशिबी उपेक्षा
शेतकरी हतबल : आर्थिक मदत देण्याची मागणी
सिंदेवाही : देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला उपेक्षित जीवन जगत आहे. तालुक्याला धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्यात वावरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाच्या छायेत वावरणारा शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकला नाही. जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहे. मात्र त्यांच्याकडे शासन, प्रशासन सातत्याने दुर्र्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस कर्जाचे ओझे वाढत आहे. दिवस-रात्र शेतीमध्ये घाम गाळणाऱ्या धान उत्पादकाच्या नशिबी मात्र कर्जाच्या अभिशापाचे वरदान तर नाही ना, असे म्हणावे लागत आहे. शेतकऱ्यांना भेडसाविणाऱ्या समस्या सातत्याने पाठलाग करीत आहे. धान उत्पादकाचे हित जोपसण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता केली जात नाही. शेतकरी कोणत्याही कष्टाची पर्वा न करता शेतीमध्ये राबतो. उभे आयुष्य शेतीच्या मशागतीमध्ये खर्ची घालणाऱ्या शेतकऱ्यांना थोडीशीही उसंत मिळत नाही.
अन्नधान्याचा पुरवठा करण्यात महत्वाची भुमिका बजावणारा धान उत्पादक शेतकरी पूर्णत: मानसिकरिताय खचून गेला आहे. एकमेव शेतीच्या मुख्य व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. काही वर्षापूर्वी धानाची शेती परवडणारी होती. शेतीच्या माध्यमातून राजवैभव उपभोगण्याचा योगसुद्धा आला. परंतु आज तशी परिस्थिती नाही. धान उत्पादकासाठी आवश्यक इतर पूरक साहित्याच्या किंमती दामदुपटीने वाढल्या. पर्यायाने धानाचे उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे. ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)