ड्रॅगन फळ लागवडीतून पहिल्याच वर्षी त्या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 23:24 IST2022-09-24T23:24:06+5:302022-09-24T23:24:37+5:30
वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. त्याला वरोरा तालुका कृषी विभाग शेगाव, मंडळ अधिकारी विजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ड्रॅगनवेल कॅक्टससारखे दिसते. लातूर जिल्ह्यातून रोपे आणण्यात आली. रोपाला दीड लाख रुपये खर्च आला. एक एकर शेतात बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर ट्रेलर पद्धतीने लागवड केली.

ड्रॅगन फळ लागवडीतून पहिल्याच वर्षी त्या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन
प्रवीण खिरटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : उष्ण कटिबंध वातावरणात ड्रॅगन फळांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन घेता येते. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सव्वा वर्षापूर्वी एका एकरात ड्रॅगन फळाची लागवड केली. पहिल्याच वर्षात एक लाख रुपयांचे नगदी उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. या फळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने नागरिक फळ घेण्याकरिता बांधावर जात आहेत.
वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. त्याला वरोरा तालुका कृषी विभाग शेगाव, मंडळ अधिकारी विजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ड्रॅगनवेल कॅक्टससारखे दिसते. लातूर जिल्ह्यातून रोपे आणण्यात आली. रोपाला दीड लाख रुपये खर्च आला. एक एकर शेतात बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर ट्रेलर पद्धतीने लागवड केली.
ठिंबक पद्धतीने पाणी देत असल्याने पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होते. सव्वा वर्षानंतर फळ येणे सुरू झाले. कुठल्याही रासायनिक व कीटकनाशकाचा वापर केला जात नाही. फक्त जैविक खताचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ड्रगन फळाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. फळ झाडालाच पिकू देत असल्याने त्याची चवही चांगली असल्याचे दिसून येते. जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतच फळ लागतात. प्रथमवर्षी लावलेले झाडे कटिंग करत ठेवल्याने ते दहा वर्षांपर्यंत फळे देतात, अशी माहिती युवा शेतकरी मनीष पचारे यांनी दिली.
फळाचे वजन ३५० ते ४०० ग्रॅम
- ड्रॅगनच्या एका फळाचे वजन ३५० ते ४०० ग्रॅम आहे. ते झाडाला पिकल्यानंतर तोडली जातात. सध्या २५० रुपये प्रतिकिलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून वरोरा तालुक्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी पडीक व हलक्या प्रकारच्या जमिनीवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यास कृषी विभागाकडून अनुदान दिले जाते.
-विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगाव.